| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील तळोजा आरएएफ सर्कल येथील सिग्नलवर प्रवाशांनी भरलेली एनएमटी बस उभी असताना चालकाला अचानक रक्ताची उलटी झाली. त्यानंतर चालक स्टेअरिंगवरच बेशुद्ध पडल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सिग्नलवर तैनात असलेल्या तळोजा वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
रघुनाथ काटे असे चालकाचे नाव असून, ही बस तळोजा फेज-1 येथून खारघर रेल्वे स्थानकाकडे जात होती. सिग्नलवर बस उभी असतानाच चालकाची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच पोलीस हवालदार राजेश गाढवे यांनी तातडीने बसजवळ धाव घेतली. त्यांनी चालकाला प्राथमिक उपचारासह सीपीआर देत बसमधून खाली उतरवले. यावेळी पोलीस शिपाई सोपान आव्हाड यांनीही मदत केली. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी वेळ न दवडता त्याला रिक्षातून जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे चालकाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली. दरम्यान, चालक सिग्नलवर बस उभी असतानाच बेशुद्ध पडल्याने बस अनियंत्रित होऊन इतर वाहनांना धडकण्याची शक्यता होती. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
