। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
पाली-खोपोली राज्य महामार्गावर जांभुळपाडा येथील हॉटेल शिवारच्या समोर गुरुवारी (दि.20) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक मोठे जीर्ण झालेले झाड अचानक कोसळले. यामुळे संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. स्थानिकांच्या मदतीने हे झाड तोडून बाजूला काढण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
झाड पडल्याची माहिती मिळताच सरपंच गिरिश दळवी हे ताबडतोब आपला जेसीबी घेऊन घटनास्थळी आले व लगेचच झाड हटविण्याचे काम सुरु केले. सकाळची वेळ असल्याने विद्यार्थी व चाकरमानी यांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तसेच एक शव असलेली रुग्णवाहिका देखील रस्ता बंद झाल्यामुळे अडकून पडली होती. या सर्वांना जाण्यासाठी मार्ग जलदगतीने मोकळा करणे आवश्यक होते. त्यामुळे दोन जेसीबी लावुन रस्ता मोकळा केला व वाहतूक सुरळीत केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गिरीश दळवी व सामाजिक कार्यकर्ते दत्ता पालवे, मराठा महासंघ सुधागड अध्यक्ष व रायगड भूषण गणेश बुवा देशमुख, जांभुळपाडाग् सदस्य प्रभाकर खंडागळे, सचिन शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाली-खोपोली राज्य महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूला काही जीर्ण झालेली झाडे आहेत. ही झाडे केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी देखील होऊ शकते. म्हणून एमएसआरडीसी प्रशासनाने ही झाडे लवकरात लवकर हटवावी व मार्ग सुरक्षित करावा.
प्रभाकर खंडागळे,
ग्रामपंचायत सदस्य,
जांभूळपाडा-वर्हाड