। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. मागील पंधरा दिवसापुर्वी रेवस-अलिबाग रस्त्यावरील मानीफाटा जवळ एक झाड कोसळले होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी दुपारी खडताळ पुल ते बुरुमखान दरम्यान एक झाड उन्मळून पडले. या झाडामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तेलंग यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने कटरद्वारे झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले आहे. झाड रस्त्याच्या मधोमध आडवे पडल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली. मात्र वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे.
अर्ध्या तासापूर्वीच काही किरकोळ किराणा मालाच्या वस्तू आणण्यासाठी खाली गेलो होतो. दुकानातून परत येताना वाटेत पावसाची मोठी सर आली म्हणून जवळच असलेल्या एका भव्य वडाच्या झाडाखाली पाऊस थांबेपर्यंत वाट बघत उभा राहिलो होतो. आणि आत्ताच काही मिनिटांपूर्वी ते प्रचंड वडाचं झाड सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे अक्षरशः जमीनदोस्तच झालं आहे. हीच घटना अर्ध्या तासापूर्वी घडली असती तर, उद्याच्या दैनिक कृषीवलमधे माझ्या मृत्यूचीच बातमी वाचायला मिळाली असती.
गिरीश सुधा-विद्याधर कात्रे