| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणुका शांत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगामार्फतदेखील या मतदारसंघांसाठी खर्च, सर्वसाधारण तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून, ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांसाठी 4 सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व निवडणूक निरीक्षक यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून, जिल्हाधिकारी जावळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. 188 पनवेल, 189 कर्जत मतदार संघासाठी दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 190 उरण आणि 191 पेण मतदारसंघासाठी संतोष कुमार राय तर 192 अलिबाग अलिबाग मतदार संघांसाठी रुही खान, 193 श्रीवर्धन आणि 194 महाडसाठी सतीश कुमार एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हे सर्व साधारण निरीक्षक पाहणी करतील. तसेच मतदान यंत्रे व मतदान अधिकारी/कर्मचार्यांची दुसरी सरमिसळ, उमेदवारी अर्ज छाननी, प्रक्रिया, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस, मतदानानंतर निवडक मतदान केंद्रांच्या संविधानिक कागदपत्रांची छाननी, मतमोजणी व विजयी उमेदवाराची घोषणा यासर्व प्रसंगी हे निरीक्षक उपस्थित राहतील.
निवडणुकांदरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, कायदा-सुव्यवस्था याबाबत हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील.