| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून, या पार्श्वभूमीवर सागाचीवाडी येथील पांडू निरगुडे हे आदिवासी व्यक्ती बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पांडू निरगुडे हे नेहमीप्रमाणे नेरळ बाजारपेठेत काही कामानिमित्त गेले होते. त्यांनतर दुपारच्या सुमारास ते नेरळ येथून आपल्या गावी निघाले असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यानंतर ते घरी पोहोचलेच नाहीत. रात्री उशिरापर्यंत वाट पाहूनही त्यांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने सागाचीवाडीतील ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. गेल्या चार दिवसांपासून गावकरी, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक जंगल परिसर, रस्ते, ओढे-नाले आणि आजूबाजूच्या भागात शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून, अनेक ठिकाणी पाण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे शोधकार्य करताना अडचणी निर्माण होत आहेत. पांडू निरगुडे यांच्याकडे मोबाईल फोन नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य होत नसून, शोधकार्य अधिकच कठीण झाले आहे. या घटनेमुळे सागाचीवाडी व परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी व्यक्ती बाजारपेठेतून हरवली
