। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील मोलाचा क्षण असतो. पण अनेकदा शिक्षणाच्या जिद्दीपुढे विवाहासारखे सोहळे पण बाजुला ठेवत आपण ध्येय गाठतो. असाच एक सुखद प्रसंग जेएसएम महाविद्यालयात घडला. एका आदिवासी विद्यार्थिनीने आधी परीक्षेचा पेपर देणे पसंत करीत मगच विवाहाच्या बोहल्यावर चढणे पसंत केले.
अलिबागमधील जेएसएम कॉलेजमध्ये टीवायबीकॉम या वर्गात शिकणारी प्रगती संतोष नाईक या विद्यार्थिनीच्या बाबतीत एक विशेष नोंद घेण्यासारखी घटना घडली आहे. प्रगती नाईक ही अलिबाग तालुक्यातील मैनुशेट वाड्याजवळील श्रीराण या पाड्यावरील आदिवासी समाजातील विद्यार्थीनी असून आपल्या जिद्यीवर ती पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करीत आहे. गेले तीन वर्षे ती जेएसएम कॉलेजमध्ये शिकत असून आज सकाळी साडेदहा वाजता तिचा एक्सपोर्ट मार्केटिंगचा होता. विशेष म्हणजे आजच दुपारी 2 वाजता तिचे लग्न होते.
प्रगतीला शिक्षणासाठी सहकार्य करणार्या मैनुशेट वाडा येथे राहणार्या सुहास म्हात्रे व अनुजा म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगतीला शिक्षणाची आवड असून लहानपणापासून तीची प्रगती उत्तम राहिली आहे. शेतीची व इतर सर्व कामे करून ती शिक्षण घेत आहे. तिनविरा परीसरातील आदिवासी वाडयामधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारी ती पहिलीच मुलगी आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील व उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांनी प्रगतीच्या विवाहानिमित्त अभिनंदन केले असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळचा पेपर सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तीचे अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या.