| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप, महाराजांचे विचार आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची भुरळ तरुणाईवर मोठ्या प्रमाणात पडलेली आहे. त्यामुळेच शरीरावर शिवाजी महाराजांचे चित्र, त्यांची राजाज्ञा, राजमुद्रा हे टॅटू कोरलेले, महाराजांप्रमाणे केस, दाढी ठेवून आभूषणे परिधान करणारे तरुण सर्वत्र दिसतात. याबरोबरच असंख्य तरुण, शिवप्रेमी संस्था व संघटना जिल्ह्यातील महाराजांचे गडकिल्ले संवर्धनाच्या कामात झोकून देताना दिसत आहे. शिवाय शिवव्याख्यान, शिवकाली शस्त्रकला, मशाल रॅली, प्रदर्शने आदी विधायक उपक्रमांत गुंतलेली दिसतात.
शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यातील असंख्य दुकाने महाराजांचे चित्र असलेल्या लहान-मोठ्या झेंड्यांनी सजली आहेत. शिवजयंतीच्या काही दिवस आधीपासूनच असंख्य दुचाकी, रिक्षांपासून महागड्या गाड्यांवरदेखील हे झेंडे डौलाने फडकत आहेत. महाराजांच्या मूर्त्यांनादेखील मागणी वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असंख्य मूर्ती व झेंडे विक्रेते नजरेस पडतात. शिवजयंतीनिमित्त रायगडावर जाणारे शिवप्रेमी आवर्जून ते खरेदी करतात.
रायगडावरून शिवज्योत रॅली
शिवजयंतीनिमित्त आदल्या व त्या दिवशी असंख्य शिवप्रेमी दुर्गदुर्गेश्वर रायगडावर दाखल होतात. शिवजयंतीला सकाळी हे सर्व शिवप्रेमी हातात शिवज्योत व झेंडे घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात. मुंबई-गोवा महामार्ग, पाली खोपोली राज्य महामार्गावरून कोणी दुचाकी, कोणी पायी तर कोणी गाड्या व टेम्पोतून शिवगर्जना देत जातात त्यामुळे रस्ते मार्ग भगवामय होतात.
दुर्गसंवर्धन शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेले असंख्य छोटे-मोठे गडकिल्ले रायगड जिल्ह्यात आहेत. येथे वर्षभर शिवप्रेमी व दुर्गसंवर्धन संघटना संवर्धन व साफसफाईची कामे करतात. त्यामुळे अनेक दुर्लक्षित किल्ले नव्याने उजेडात आले आहेत. पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी या मोहिमांत सहभागी होतात. शिवजयंतीला तर गडांची सजावट केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
शिवकालीन युद्ध कला जोपासली सुधागड तालुक्यातील जय हनुमान आखाडा शिळोशी हे याच शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध कलेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शहर व गावखेड्यातील मुलांना देत आहेत. या मंडळाचे अध्यक्ष शरद गोळे हे यासाठी प्रयत्नशील आहेत. श्रीवर्धनमधील शैलेश ठाकूर यांनी 2005 पासून अथक परिश्रम करून विविध शिवकालीन शस्त्र जमा केली आहेत. तलवार, भाला, दांडपट्टा, ढाल, विटा व बाण अशा शस्त्रांचा संग्रह त्यांनी केला आहे. शैलेंद्र ठाकूर सामाजिक कार्याबरोबरच कराटे, मल्लखांब व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण देतात.
मागील अनेक वर्षांपासून शिवकालीन शस्त्रास्त्र व युद्धकलेची प्रात्यक्षिके करत आहे. हा वारसा घरातूनच मिळालेला आहे. असंख्य तरुण व मुले मुली या कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. चांगले प्रशिक्षण व योग्य सरावाद्वारे प्रभुत्व मिळविता येते. शारीरिक व मानसिक सुदृढता येते. तसेच महाराजांच्या युद्धकलेची जोपासना होत असल्याने अभिमानदेखील वाटतो.
श्रीधर गोळे, तरुण, जय हनुमान आखाडा शिळोशी
सर्वच तरुणांमध्ये महाराजांबद्दल नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांचे गडकिल्ले आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. त्यांचे संवर्धन होऊन नव्या पिढीलाही ते चैत्यन्य देत राहोत यासाठी गडकिल्ले स्वच्छता मोहीम व गडसंवर्धनाचे काम न चुकता करतो. त्यातून एक ऊर्जा मिळते.
दत्तात्रय सावंत, दुर्गसंवर्धक, पाली
तरुणाईला शिवाजी महाराजांबद्दल खूप आकर्षण आहे. महाराजांप्रमाणे रंगभूषा करुन व त्या टॅटू काढून त्यांना हे सर्व थ्रील अनुभवता येते. परंतु, हे सर्व करत असताना महाराजांच्या प्रतिमेला कोठेही धक्का लागणार नाही व कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही याची खबरदारी या तरुणांनी घेतली पाहिजे. आपल्याकडून पुढील पिढी आदर्श घेत आहे.
अमोल मोरे, अध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान