तळ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

। तळा । वार्ताहर ।
गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या तळा तालुक्यातील गावांना शिंदे गट व भाजपकडून सुरुंग लावला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तळा तालुका हा खा. सुनील तटकरे यांचे एकमेव वर्चस्व असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. पंचायत समिती सभापती, झेडपीचे सदस्यही राष्ट्रवादीचेच निवडून जातात. तसेच जवळपास 25 ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. यासह विधानसभा निवडणुकीत तालुक्यातुन राष्ट्रवादीला भरघोस मताधिक्य मिळते. यावरून राष्ट्रवादीची ग्रामीण भागातील ताकद लक्षात येते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि त्यानंतर तळा तालुक्यात राष्ट्रवादीला घरघर लागण्यास सुरुवात झाली. एवढी वर्षे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्तेही पक्षातून बाहेर पडू लागले. राष्ट्रवादीला पहिला धक्का बसला तो रहाटाड गावाच्या भाजप प्रवेशाने. रहाटाड गावातील मोहल्ला सोडला तर हनुमान नगर, मराठा आळी व कोळीवाड्यातील बहुतांश ग्रामस्थांनी घड्याळ सोडून कमळ हाती घेतले. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून तारस्ते गावात प्रवेश घेऊन राष्ट्रवादीला दुसरा धक्का दिला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर गावांचे पक्षांतर होणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात असून जर का अशीच परिस्थिती राहिली तर विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version