। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या दिवंगत पितरांचे स्मरण केले जाते. यावेळी कावळ्याला नैवेद्य दाखवून त्याच्या माध्यमातून पूर्वजांप्रती कृतज्ञता दाखवली जाते. सर्वपित्री अमावस्येचे हे मर्म समजून घेऊन, कावळ्याला नैवेद्य दाखवण्याच्या प्रथेला कालसुसंगत व समाजोपयोगी पर्याय सुचवला जावा या अनुषंगान महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा पेणच्यावतीने या दिवशी सारवसई येथील चाइल्ड हॅवेन या अनाथ आश्रमातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मॅजिक शोचे आयोजन देखील करण्यात आले होते.
चाइल्ड हॅवेन या अनाथ आश्रमातील मुले पेण शहरातील वेगवेगळ्या शाळेत शिकायला येत असतात. दुपारच्या सुट्टीनंतर किंवा शाळा सुटल्यावर काही मुले पाणीपुरी किंवा इतर खाऊ खाण्यासाठी जात असतात. परंतु, या मुलांकडे पैसे नसल्यामुळे ते हे खाऊ खाऊ शकत नव्हते. यामुळे महाराष्ट्र अंनिसने पाणीपुरीची गाडी अनाथ आश्रमच्या वसतिगृहावर उपलब्ध करून दिली. या उपक्रमाला नितीन निकम, राजरत्न लोखंडे आणि मारुती गायकवाड यांनी आर्थिक मदत केली. यावेळी, अंनिसचे कार्यकर्ते पोरे, एन.जे. पाटील, संदेश गायकवाड, नंदकिशोर परब, आदेश पाटील, हेमंत पाटील, डॉ. सुजाता निकम व सावनी गोडबोले उपस्थित होते.
मॅजिक शोचे आयोजन
मुलांच्या मनोरंजनासाठी मॅजिक शोचे आयोजन करण्यात आले होते. मॅजीशीयन साहिल गायकवाड यांनी वेगवेगळे जादूचे प्रयोग दाखवून मुलांना चांगलेच खिळऊन ठेवल. तसेच, जगदशी डंगर याने गाण्याच्या माध्यमातून मनोरंजन केले.