पौर्णिमेच्या प्रकाशात वन्यजीव गणनेचा थरार
| मुरुड-जंजिरा | सुधीर नाझरे |
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने फणसाड वन्यजीव अभयारण्य येथे आयोजित निसर्ग अनुभव कार्यक्रमात पर्यटकांनी वन्यजीव गणनेसोबत जंगलातील रात्रीचा अनोखा अनुभव घेतला. या उपक्रमात एकूण 26 पर्यटक सहभागी झाले होते. पुणे, मुंबई, मुरुड, रोहा आणि अलिबाग येथून आलेल्या सहभागींसह वनरक्षक आणि वनमजुरांनी आठ मचाणांवर रात्रभर ठाण मांडून निरीक्षण केले.
धरणाची गाण, बांधतलाव, केतकीची गाण, चिखलगाण, भांडव्याचा माळ, चाक्याचा माळ, आंबेगाण आणि विहूर धरण परिसरात बसून पर्यटकांनी वन्यजीवांचे निरीक्षण केले. पौर्णिमेच्या चांदण्यात बिबट्या, साळिंदर, शेकरू, भेकर, रानडुक्कर, रानमांजर, मुंगूस, तसेच विविध साप आणि पक्ष्यांचे दर्शन घडले. विशेष म्हणजे एका पर्यटकाला बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले.
वन्यजीव गणनेदरम्यान सांबर, भेकर, रानडुक्कर, बिबटे, शेकरू, ससा, रानगवे, साळिंदर, माकडे, वानर, मोर, गिधाड आदी प्राण्यांची नोंद करण्यात आली. तसेच राखी धनेश, समुद्र गरुड, बुलबुल, सनबर्ड, श्यामा, मलबार धनेश, घुबड यांसारख्या विविध पक्ष्यांचेही निरीक्षण झाले. या कार्यक्रमाचे नियोजन फणसाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे, वनपाल आदेश पोकळ आणि हरिश्चंद्र नाईक यांनी केले.
वन्यजीव गणनेची ठळक नोंद
सांबर : 9, भेकर : 3, रानडुक्कर : 11, बिबटे : 3, शेकरू : 13, ससा : 9, रानगवे : 6, रानमांजर : 1, साळिंदर : 3, मुंगूस : 3, माकडे : 33, वानर : 31, रानकोंबडे : 11, मोर : 9, गिधाड : 21, ब्राह्मणी घार : 3.
अनिल कुदळे,
फणसाड अभयारण्यातील हा निसर्ग अनुभव अविस्मरणीय आहे. पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात जंगलातील शांतता आणि प्राण्यांचे आवाज ऐकणे ही आयुष्यातील खास अनुभूती ठरली. वन विभागाने दिलेली माहितीही अत्यंत उपयुक्त होती. पुन्हा एकदा येथे भेट देण्याची इच्छा आहे.
पर्यटक








