विधवा महिलांना दिला हळदी कुंकूवाचा मान
| पनवेल | प्रतिनिधी |
दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू चा थाट खास ‘ती’ च्या साठी या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदी कुंकूची सुरुवात विधवा महिला व एल.जी.बी.टी यांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा हीच भावना ठेऊन हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजसेविका इंदू झा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कामोठे येथील साई द्वारका क्लिनिक व नर्सिंग होमचे डॉ. हेमंत पाटील सर, कांचनमाला इन्फ्रा कंपनीच्या डॉ. शर्वरी पाटणे, जयदादा डिगोळे व बायहार्ट पाथ लॅबचे डॉ. तान्हाजी डेरे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन यावेळी दिशा व्यासपीठाला मिळाले. पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणं कितपत योग्य आहे. दुखा:चा डोंगर डोक्यावर कोसळलेल्या असतानाही शेती, उद्योगधंदे, घरं चालवणे, मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या महिला आपलं कर्तव्य समजून पार पाडतात. तरीही अशा महिलांना समाजात अशा समारंभात बाजूला सारलं जात म्हणूनच हा पायंडा आम्ही 2020 पासून मोडीत काढत आलेलो आहोत हा हळदी कुंकवाचा हा थाट खास त्यांच्यासाठीच असतो असे यावेळी दिशा संस्थापक निलम आंधळे म्हणाल्या.
कुंकवाचा धनी परलोकवासी झाल्यानंतर घरीदारी उपेक्षेची नजर वाट्याला आलेल्या महिलांच्या कपाळी हळदी-कुंकवाची बोटं लागली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले एकमेकींना आलिंगन देऊन निःशब्द भावना नजरेतून यावेळी व्यक्त झाल्या. यावेळी एल.जी.बी.टी विकास यांचाही मान सन्मान करण्यात आला. आपल्यातीलच एक असलेल्या या व्यक्तिमत्वास सर्वांनी स्वीकारावं त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यांनाही तेवढाच मान सन्मान मिळावा या उद्देशाने त्यांनाही या समारंभात व्यक्त होण्याची संधी मिळाली व या समारंभाचे भावनिक दृश्य यावेळी पहायला मिळाले .