सुरवंट ते फुलपाखरू अनोखा प्रवास!

। माणगाव । सलीम शेख ।
पावसाळा सुरू होताच निसर्गात अनेक प्रकारचे बदल होतात. ओहोळ वाहू लागतात, रानमाळ हिरवे होते, विविध प्रकारचे कीटक, प्राणी, पक्षी दिसून येतात. यामध्ये विविध रंग व आकारांमध्ये शेताच्या बांधावर, फुलांवर, पानांवर, खोडावर दिसणारे सुरवंट पावसाळ्याच्या या दिवसात सर्वत्र दिसून येत आहेत.

सुरवंट फुलपाखराचा किंवा पाकोळी अवस्थेतील किड्याचा प्रकार आहे. सुरुवातीच्या पावसात सुरवंट तयार होतात. केसाळ अळी असलेल्या सुरवंटाचे विविध आकार व प्रकार आढळतात पूर्ण शरीर वर केस असणारे हे कीटक झाडांच्या खोडावर, पानांवर, गवतावर, धान्याच्या पातीवर आढळून येतात. काळा, निळा, सफेद, हिरवा, कधी कधी संमिश्र रंगाचे सुरवंट आढळतात. सुरवंटाची लांबी 5 मिलिमीटर ते 5.7 मिलिमीटर असते. याच्या पोटाखालची बाजू सोडल्यास त्याच्या अंगावर सर्वत्र उभारलेले केस असतात. हे केस शक्यतो तंतूसारखे असतात. काही सुरवंटांच्या अंगावरील केस चकाकणारे पांढरे शुभ्र असतात.


पावसाळ्याच्या सुरुवातीला किड्यासारखा दिसणारा सुरवंट पाऊस सरता-सरता सुंदर अशा फुलपाखरा दिसून येतो. 98 टक्के सुरवंटांचे केस विषारी असतात. या केसांना मानवाचा कळत नकळत स्पर्श झाल्यास स्पर्श झालेल्या त्वचेवर दाह होतो. खाज येऊन पुरळसदृश्य भाग तयार होतो. त्वचा लालसर होते. ग्रामीण भागात सुरवंटाचा त्वचेशी संपर्क आल्यास सदर ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावतात. सुरवंट हे खोड, पान, तृण खाऊन उपजीविका करतात. अनेक सुरवंट एकदा एखाद्या पानावर तृणावर बसल्यास ते संपूर्ण खाऊन फस्त करतात. पिकांवर बर्‍याच वेळा यांचा प्रादुर्भाव होत असतो.

जीवनकाळ अवघा दोन महिन्यांचा
सुरवंटाचा जीवनकाळ दीड ते दोन महिन्यांचा असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात सुरवंट दिसतात, तर पावसाळ्याच्या अखेरीस ते समाधिस्त होतात. त्यानंतर स्वतःभोवती कोळ्याप्रमाणे कवच तयार करतात. साधारणतः एका आठवड्याच्या अंतराने त्या कवचामधून विविध रंगाच्या फुलपाखराचा जन्म होतो. सुरुवातीपासूनच सुरवंट ते फुलपाखरू हा प्रवास अतिशय मनवेधक असतो.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जंगल परिसरात शेताच्या बांधांवर, पाना, फुलांवर, गवतावर अनेक ठिकाणी विविध आकार, प्रकारांचे सुरवंट दिसून येत आहेत. रंगीबेरंगी असणारे हे सुरवंट दिसायला आकर्षक असले तरी त्यांचा त्वचेशी संपर्क आल्यास खाज सुटणे, पुरळ उठणे असे परिणाम होतात. ग्रामीण भागात तुळशीचा पाला लावून खाजेवर प्रथमोपचार केला जातो. कधी कधी एक ते दोन दिवस ही खाज, पुरळ राहते. – विलास देगावकर, प्राणी पक्षी निरीक्षक, माणगाव

Exit mobile version