निसर्गप्रेमींना कुतूहलाचा विषय, वैशिष्ठ्यपूर्ण आवाजाने लक्ष वेधणारा प्राणी
| माणगाव | वार्ताहर |
पाऊस झाला की निसर्गाला हिरवाईचा बहर येतो. झरे, ओहोळ वाहतात माळराने हिरवीगार होतात. निसर्गाला एक प्रकारे सौंदर्याचे वरदान लाभते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक माळरानावर, शेतातून, रस्त्यांच्या दुतर्फात दिसून येतात. या प्राण्यांमध्ये आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्राणी म्हणजे बेडूक होय. पावसाळ्यात सर्वत्र दिसणारे बेडूक हिवाळा उन्हाळ्यात स्वतःला जमिनीत गाडून घेतात. पाऊस सुरू झाल्या बरोबर हे बेडूक जमिनीतून वर येतात. गेले काही दिवस संततधार पाऊस सुरू झाल्याने बेडूक सर्वत्र दिसत असून त्यांचा डराव, डराव आवाज ऐकू येऊ लागला आहे.
या बेडकांमध्ये विविध प्रकारच्या आकाराचे व रंगांचे बेडूक पर्यावरणात आढलून येऊ लागले असून निसर्गप्रेमींना कुतूहलाचा विषय होत आहे. राखाडी, पिवळ्या, मातकट रंगांचे बेडूक आढळून येत असून निसर्गातील रंगी बेरंगी बेडूक पाहणे कुतूहलाचा विषय होत आहे. पावसाळ्यात आढळणाऱ्या सर्वसामान्य बेडकांपेक्षा यावर्षी विविध प्रकारचे आणि रंगांचे बेडूक आढळून येत असल्याने पर्यावरप्रेमींनी कुतूहल व्यक्त केले आहे. बेडूक उभयचर प्राणी असून पावसाळ्यानंतर जमिनीमध्ये गाढ निद्रेत तो स्वतःला झोकून देतो. साधारणतः पाच ते सहा महिने बेडूक जमिनीत गाढ निद्रेत असतात व मान्सूनच्या पावसात पुन्हा आपला दिनक्रम सुरू करतात.
मान्सूनच्या पावसात बेडूक प्रजननासाठी डराव डराव आवाज करतो करून मादीला आकर्षित करतो. मान्सूनचा सुरुवातीचा काळ बेडकांचा प्रजननाचा काळ म्हणून ओळखला जातो. या काळात शेतातून, माळरानात बेडकां चा आवाज ऐकू येतो. वर्षानुवर्षे माणसांच्या जीवनशैलीमध्ये अधिकाधिक बदल झालेले आहेत. एवढी प्रगती करून देखील निसर्गातील घडणारे बदल मनुष्याला देखील समजलेले नाहीत. परंतु, वन्यप्राणी किंवा उभयचरांना निसर्गाबद्दल असलेले ज्ञान वंशपरंपरेने टिकून आहे. त्यामुळे पाऊस कधी येणार आहे हे माणूस निश्चित सांगू शकत नाही, परंतु वन्यजीव मात्र याचे भाकीत अचूक करतात. बेडकांचे आवाज येणे हा पावसाळा सुरु होण्याचा शुभ संकेत आहे असे मानतात. पावसाळा म्हणजे बेडकांच्या विणीचा हंगाम. अनेक दिवस सुप्त अवस्थेत पडलेले बेडूक पहिल्या पावसाबरोबर अचानक ताजेतवाने होऊन पुन्हा जिवंत झाल्यासारखे अगदी आनंदानी सक्रिय होतात. पावसाळी दिवसांत अनेक बेडूक प्रजातीमधील नर प्रजननासाठी भडक रंग धारण करतात व विशिष्ट आवाज काढतात. ह्या दिवसांमधले त्यांचे रंग आणि आवाज निरीक्षण करणाऱ्या अनेकांना आकर्षित करतात.