| हरारे | वृत्तसंस्था |
आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीचा अंतिम सामना श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. श्रीलंकेने नेदरलँड्सला 105 धावांत गुंडाळत 128 धावांनी सामना जिंकून विजेतेपद पटकावले. यासोबत भारतात खेळल्या जाणार्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका विजयाचा मोठा दावेदार बनला आहे. कारण भारतात खेळल्या गेलेल्या 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी अप्रतिम राहिली होती. 2011ला त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता, मात्र भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. हरारे येथे खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरने दमदार सुरुवात केली. पथुम निशांकाने 23, सदीरा समरविक्रमाने 19 धावा केल्या. यानंतर कुसल मेंडिसने 43 आणि सहान आर्कचिगेने शानदार अर्धशतक झळकावताना 57 धावा केल्या. चारिथ अस्लंकाने 36 चेंडूत 36 धावा केल्या तर वनिंदू हसरंगाने 29 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचा संघ 47.5 षटकांत सर्वबाद 233 धावांवर आटोपला. नेदरलँड्सच्या 4 गोलंदाजांनी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
प्रत्युत्तर देताना नेदरलँड्सच्या सर्व फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. पण 50 धावांच्या आतच नेदरलँडचे 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आणि संपूर्ण संघ 23.3 षटकात 105 धावांत ऑलआऊट झाला. दिलशान मधुशंकाने कहर केला आणि पहिल्या 5 षटकात 9 धावा देत विकेट 3 घेतल्या. मधुशंकाशिवाय वनिंदू हसरंगानेही चांगली गोलंदाजी केली. त्याने तीन गडी बाद केले. त्याच्याशिवाय महिष तिक्ष्णाने नेदरलँडच्या 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या पराभवामुळे नेदरलँडचे कोणतेही नुकसान झाले नाही. तो याआधीच भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीपूर्वीच विश्वचषकाचे तिकीट निश्चित केले होते.