स्वतंत्र व विवेकी विचार देणारे शिबीर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
महाराष्ट्र अंनिसची पनवेल शाखा महिलांसाठी गेली आठ वर्षे झेप शिबीर घेत आहे. चिंचवली या ठिकाणी नुकतेच दोन दिवसीय आठवे शिबीर घेण्यात आले. चाळीस महिलांच्या सहभागाने रंगलेली ही झेप वक्ते आणि अॅक्टिव्हिटी यांनी आणखीनच उंच नेली.
शिबिराचे नेहमीप्रमाणे अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले. झाडाच्या फांद्यांना क्रांतिकारक व महान महिलांची कार्ये लिहिली होती. त्या कार्याप्रमाणे त्या त्या फांदीला संबंधित सुधारक महिलेचा फोटो प्रत्येक गटाने लावला व शेवटी अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी मुख्य खोडाला सावित्री बाईंचा फोटो लावून उद्घाटन केले. दुपारच्या सत्रात श्रीराम कोळी यांच्या टीमने व्हॅली क्रॉसिंग आणि झुमारींग या अडव्हेंचर अॅक्टिव्हिटी घेतल्या. त्यामध्ये महिलांनी खूप मज्जा केली. यामुळे वेगळा आत्मविश्वास त्यांना मिळाला. संध्याकाळी प्रियांकाने वेगळ्या पद्धतीने ओळख सत्र घेतले. त्यानंतर वरदराजने घेतलेल्या खेळ सत्रामध्ये सर्वच रंगून गेले. रात्री जेवणानंतर पोपटीच्या सोबतीने कॅम्प फायर घेण्यात आले. सुरुवातीस पनवेल शाखेने संविधानावरील मस्त चाललय आमचं? हे पथनाट्य सादर केले.
दुसर्या दिवसाची सुरुवात झुंबा या नृत्य प्रकाराने झाली. हा ए मुमकिन हैच्या लेखिका व कार्यकर्त्या तरू जिंदल यांचे सत्र होते. तरू जिंदल यांचा प्रवास उपस्थितांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा होता. प्रत्येकीला आपापलं कुरुक्षेत्र ठरवायला प्रेरणा देणारा होता. नंतरच्या सत्रात मानसी नायक हिने आर्थिक नियोजनावर सत्र घेतले. सुरुवातीस पॉवर वॉक व नंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असे हे सत्र झाले.
पारंपरिक खेळाचा आनंद व संविधान जागृती गोट्या, टायर फिरवणे, भोवरा खेळणे, पतंग उडवणे अशा पारंपरिक खेळांचा आनंद घेण्यात आला. जेवणानंतर संविधानिक मूल्यांवर गटचर्चा घेण्यात आली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही पाच गटांना नावे दिलेली. त्यावर आधारित ताज्या घटना चर्चेला देऊन ही गटचर्चा घेतली गेली. स्वातंत्र्य गटाने लगेच त्यावर पथनाट्य ही सादर केले.
आरती नाईक, महा. अंनिस पदाधिकारी व आयोजक
झेप शिबीर हे फक्त शिबीर नसून महिलांना आनंद, आत्मविश्वास, आत्मसन्मान, स्वतंत्र, धम्माल व नवीन गोष्टी शिकण्यास स्फूर्ती देणारं आणि विचारांची देवाणघेवाण करणारं सुंदर अस व्यासपीठ आहे.