लालपरीतच साजरे झाले अनोखे रक्षाबंधन

प्रवाशांच्या सेवेतून भावाला नाही वेळ
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन कानाकोपर्‍यात धावणार्‍या लालपरीवर चालक म्हणून कार्यरत असणार्‍या भावाला आपल्या लाडक्या बहिणीने एसटीतच राखी बांधून आपलं नातं आणखी वृद्धींगत केले.

भाऊ-बहिणींचा प्रवास सुखकर करणारे एसटी महामंडळातील चालक भीमराव सुर्यवंशी श्रीवर्धन आगारात कार्यरत आहेत. रक्षाबंधनामुळे प्रवासी सेवेतून त्यांना वेळ नसल्यामुळे त्यांच्या भगिनी सुनिता नवनाथ गायकवाड यांनी खारघर येथे थेट बसमध्येच राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. त्यावेळी या बसचे वाहक मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनाही त्यांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

सुनिता गायकवाड या मुळच्या हळद वाढवणा, ता.जळकोट, जि.लातूर येथील रहिवासी आहेत. सध्या खारघर येथे राहत आहेत. चालक भीमराव सुर्यवंशी यांच्या त्या एकूलती एक बहिण आहेत. प्रवाशांची सेवा करताना भावाला बहिणीकडून ओवाळणी करणेही शक्य होत नसल्यामुळे बहिणीने थेट लालपरीतच रक्षाबंधन साजरा केला. हा क्षण पाहून बहिण-भावाच्याच नाही तर, उपस्थितांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.

आपल्या भावाचे आयुष्य यशस्वी व्हावे, यासाठी राखी घेऊन आलेल्या बहिणीच्या डोळ्यात माया होती. या सणाच्या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला राखी बांधायला जावे लागते. त्यामुळे या काळात एसटी कर्मचार्‍यांना सुट्ट्या मिळत नाहीत. मात्र याची कोणतीही खंत भावाच्या चेहर्‍यावर नव्हती. ही बाब कौतुकास्पदच आहे.
रक्षाबंधन केल्यानंतर सुर्यवंशी व आंधळे यांनी सुनिता गायकवाड यांचे पदस्पर्श करुन आशीर्वाद घेतले. यावेळी सुनिता यांनीही भावाचे औक्षण व गोडपदार्थ देऊन तोंड गोड केले. यावेळी या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाबद्दल बसमधील सर्व प्रवाशांनी अभिनंदन केले.

भावाला जनसेवेतून सुट्टी मिळत नसल्यामुळे, बसमध्ये येऊन रक्षाबंधन साजरा केला. याचा खुप आनंद आहे; कारण की इतर सर्व भाऊ-बहिणींना सुखरूप पोहचविण्याचे मोठे काम तो करीत आहे. सरकारने अशा असंख्य बहिण-भावांच्या कष्टाची खर्‍या अर्थाने सन्मानपूर्वक दखल घ्यावी ही विनंती. लालपरीच्या सर्व सेवकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुनिता गायकवाड


Exit mobile version