| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील एसओएस चिल्ड्रन व्हिलेज सोगाव संस्थेतील विद्यार्थिनींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना राखी बांधून हा पवित्र सण गुरुवारी (दि.11) साजरा केला. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी विद्यार्थिनींसोबत मनमोकळा संवाद साधून त्यांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
एसओएस चिल्ड्रन व्हिलेज सोगाव व रूरल अॅण्ड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. एसओएस चिल्ड्रन व्हिलेज सोगाव येथील सरस्वती जाधव, तनिष्का कोळी, वैशाली नाईक, मंजुषा वाघमारे, श्रावणी गायकवाड, मनीषा गुप्ता या विद्यार्थिनींनी डॉ. किरण पाटील यांना राखी बांधली. यावेळी संस्थेच्या समाजसेविका प्रेमलता तंगराज, कविता पवार, रूरल अँड यंग फाऊंडेशन संस्थापक सुशील साईकर उपस्थित होते. यावेळी घरोघरी तिरंगा मोहिमेबाबत संस्थेच्या विद्यार्थिनी जनजागृती करणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.