‘संस्कार भारती’च्यावतीने स्पर्धेचे आयोजन
। कर्जत । प्रतिनिधी ।
संस्कार भारती कर्जतच्यावतीने कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विठ्ठलनगर येथील सुनील गोगटे यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्जतमधील कराओके गायन क्षेत्रातील संदीप पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नटराज पूजन व दीपप्रज्ज्वलन संस्थेचे उत्तर रायगड अध्यक्ष पांडुरंग गरवारे, प्रमुख पाहुणे संदीप पाटील, सुनील गोगटे, माजी पदाधिकारी उर्मीला जोशी, स्पर्धेचे परीक्षक संतोष माडगूळकर व स्नेहा गोगटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ध्येयगीत सुरेखा शितोळे, दिनिती सावंत, सायली कुंभार, ज्योती कडू, स्वप्ना सोहोनी व प्राजक्ता गरवारे यांनी सादर केले.
सर्वप्रथम संस्थेचे माजी पदाधिकारी व नाट्य कलावंत प्रकाश चौथाई व नाट्यकर्मी प्रदीप पटवर्धन यांस श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्पर्धा सुरू झाली. एकूण 22 स्पर्धकांनी मराठी व हिंदी गाणी सादर केली. परीक्षक स्नेहा गोगटे व संतोष माडगूळकर यांनी प्रथम तीन क्रमांकांसह तीन उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर केली. प्रथम क्रमांक- नम्रता देवरे, द्वितीय- प्राची साळोखे व तृतीय क्रमांक ऋतिका पाठारे यांनी मिळवला, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके विवेक पांचाळ, भाविका उतेकर व मानस भोपतराव यांना मिळाले.
बक्षीस समारंभ 15 ऑगस्ट रोजी वंदेमातरम् गौरवगान या कार्यक्रमात होणार आहे.संस्कार भारतीच्या आजी व माजी सभासद तसेच संगीतप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते. संस्कार भारती, कर्जतच्या अध्यक्षा भारती म्हसे यांनी आभार प्रदर्शन केले.