मोर व ज्ञानेश्‍वरच्या दोस्तीची अनोखी कहाणी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील भिरा-आदिवासीवाडीमध्ये राहणार्‍या दहा वर्षाच्या लहानग्याची एका मोरासोबत अनोखी दोस्ती झाली आहे. हा दोस्त त्या लहानग्यासोबत सर्वत्र बिनधास्त फिरतो, बागडतो सोबतच जेवण घेतात. मोराला सुद्धा या छोट्या दोस्ताचा लळा लागला आहे. या अनोख्या दोस्तीची पंचक्रोशीत चर्चा आहे.

ज्ञानेश्‍वर भाऊ पवार इयत्ता पाचवीत टाटा विद्यालय, भिरा या शाळेत शिकणारा विद्यार्थी, आपल्या आई वडिलांसोबत जवळच असणार्‍या भिरा-आदिवासीवाडीमध्ये राहतो. वडील मजुरी करतात तर आई बकर्‍यांचा सांभाळ करून संसाराला हातभार लावते. स्थानिक शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले की, एके दिवशी त्याची आई जंगलात बकर्‍या चारण्यासाठी घेऊन गेली असता त्यांना मोराचे एक पिल्लू आढळून आले. कदाचित ते पिल्लू भरकटले असावे. त्या पिल्लाला त्यांनी घरी आणले आणि त्याचे संगोपन केले. त्या पिल्लाचा ज्ञानेश्‍वरला जास्त लळा लागला व त्या पिल्लाची खूप काळजी घेऊ लागला. त्याला वेळेवर खाऊ घालणे सुट्टीच्या दिवशी त्याला फिरवणे त्यामुळे त्या दोघांत मैत्रीचं एक घट्ट नातं तयार झालं. ज्ञानेश्‍वर जिथे जाईल तेथे त्याच्या सोबतच ते असते. वाडीतील इतर मुले देखील तेथे असतात परंतु इतर मुलांकडे न जाता फक्त ज्ञानेश्‍वरच्या पाठोपाठ आणि सोबत हे पिल्लू बागडत असते एवढा या पिल्लाला ज्ञानेश्‍वरचा लळा लागलेला आहे.


एकीकडे बर्‍याच ठिकाणी शिकारीचे प्रमाण वाढले असतांना अशा प्रकारे आदिवासीवाडीतील मुलांमध्ये मोराचे पिल्लू अगदी त्यांच्या मित्राप्रमाणे वावरत असते. विशेष म्हणजे त्याला सुरक्षिततेची हमी असल्याने ते मुक्तपणे वावरत असते. हे चित्र खूप सुखद आहे.

राम मुंडे, शिक्षक, निसर्ग व पशुपक्षी अभ्यासक, विळे
निसर्गात मुक्त संचार
जेव्हा अशा प्रकारची मोराची पिल्लं मोठी होतात आणि विणीच्या हंगामात जंगलातून इतर मोरांचे आवाज येतात तेव्हा ही पिल्लं जंगलात निघून जातात. अशा प्रकारच्या अनेक घटना मी गेली 10 वर्ष झाली पाहतोय. असे राम मुंडे यांनी सांगितले.
Exit mobile version