आपटवणेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आपटवणे येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंदाचा अनोखा अनुभव मिळाला. येथील शाळा सुरू होताच सोलापूरचे आयुक्त वैभव ढेरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता विद्यार्थी उत्साहात शाळेत दाखल झाले होते. यावेळी आयुक्त वैभव ढेरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना वह्या, पाण्याच्या बाटल्या, स्केच पेन, रंगीत खडू, बॅट, चेंडू आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नेहा ढिसे, उपाध्यक्षा मयुरी दंत, विशाल उतेकर, पांडुरंग निरगुडा, प्रकाश राठोड, चंद्रकांत दरवडे, संगीता लेंडे व मनस्वी दंत उपस्थित होते. यावेळी शाळेचे शिक्षक गणेश म्हात्रे, राजेंद्र पाटील, नवनीत म्हात्रे आणि सीमा वैद्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी गणेश म्हात्रे यांनी आयुक्त वैभव ढेरे व त्यांच्या परिवाराचे आभार मानले.
आई-वडिलांच्या स्मृती जपतानाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले हे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.







