तलाठी कार्यालयाशेजारीच सुरू प्रकार; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
| महाड | प्रतिनिधी |
महाडमध्ये पूरस्थितीनंतर सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाच्या नावाखाली वाळू उपशाचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. महसूल व जलसंपदा विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली असून, तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाकडून गाळ उपशाच्या कामासाठी संबंधित ठेकेदारांना 20 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीचा फायदा घेत रात्रीच्या वेळी सावित्री नदीपात्रात वाळू उपशाचे प्रकार वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, महाड शहरातील वाळू-रेजगा तलाठी कार्यालयाच्या शेजारीच, गांधारी रोडलगत असलेल्या जागेत रात्रीच्या अंधारात नदीपात्रातून काढून ठेवलेल्या रेजग्याची (वाळूची) चाळणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीवर चाळण बसवून वाळू गाळून त्यातून चांगल्या प्रतीची वाळू वेगळी काढली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शहराच्या हद्दीत आणि तलाठी कार्यालयाच्या जवळच सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा प्रकार प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे अनधिकृत उत्खनन आणि वाळू चाळणीचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे दिसत असताना, दुसरीकडे प्रशासनाची रात्रीची गस्त पथके नेमकी काय करत आहेत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. गस्त पथके झोपेत आहेत की संबंधित अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
सावित्री नदीपात्रातील वाळू उपसा, वाळूची चाळणी आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी, ट्रॅक्टर व ट्रॉलींवर प्रशासन कारवाई करणार का, याकडे महाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
तलाठी कार्यालयाशेजारीच वाळू चाळणी!
महाड शहरातील वाळू-रेजगा तलाठी कार्यालयाच्या शेजारीच रात्रीच्या वेळी वाळू चाळणीचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गस्त पथके कुठे?
अनधिकृत उत्खनन आणि वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीच्या गस्त पथकांची व्यवस्था असतानाही हा प्रकार सुरू असल्याने गस्त पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणा कारवाई करणार की पुन्हा एकदा दुर्लक्ष होणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.







