अलिबागमध्ये सत्यवानांची अनोखी वटपूजा!

| रायगड | प्रतिनिधी |

सावित्रीचे कुंकू टिकवून ठेवण्यासाठी या वेळेस सत्यवानांनी पुढाकार घेतला. वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यवानांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यात वडाचे झाड लावून अनोखी वटपूजा केली.

गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग बायपास येथील खड्ड्यांच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि हेच अपघात टाळण्यासाठी रस्तेदुरुस्तीची मागणी नागरिक करत आले आहेत . हे खड्डे बुजवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. परंतु या मागणीकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल आहे. या रस्त्यावर सुमारे 3 फुटांचे खड्डे आहेत. पावसाळ्यात पाणी साचून या खड्ड्यांचे तळे होते. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहेत व या ठिकाणी कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपेक्षित अपघात टाळण्यासाठी स्थानिक तरुणांनी हे पाऊल उचलले. या तरुणांनी वटपौर्णिमेच्या दिवशी शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वडाचे झाड लावून विधिवत पूजा करून वडाला फेर्‍या मारल्या. या दरम्यान तरुणांनी वाहनचालकांचे प्राण वाचवण्याचे साकडे घालून अधिकारी वर्गाला सद्बुद्धी देण्याची विनवणी केली. तरुणांनी केलेला हा प्रकार पाहून वाहनचालकांनी आणि नागरिकांनी त्यांना साथ दिली.

Exit mobile version