जि.प.चा निष्काळजीपणा; विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या नशिबी पायपीट
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील बोरघर फाटा ते रामराज या जिल्हा परिषदेच्या अख्यत्यारित येणाऱ्या रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून वाहन चालविताना वाहनांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाल्याने बोरघर फाटा ते रामराजपर्यंतची एसटी बससेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद केली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला असून, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
अलिबाग तालुक्यातील बोरघर फाटा ते रामराज रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. फक्त डागडुजी करून येथील नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न असतानादेखील जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याच्या खड्ड्यांबाबत गांभीर्याने चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या रस्त्याची अवस्था आजही जैसे थे अशीच आहे. यंदादेखील पावसामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. ठिकठिकाणी मोठेे मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अनेकवेळा अपघात होण्याची भीतीदेखील निर्माण होत आहे. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक असताना, वाहन चालविणेदेखील कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अलिबाग एसटी बस आगाराच्या प्रशासनाने बोरघर फाटा ते रामराजपर्यंतची एसटी बस सेवा बंद केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावरून एसटी बंद केल्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन किलोमीटर चालत प्रवास करावा लागत आहे. त्यात विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटी बस बंद झाल्याने रामराज बाजारपेठेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर शनिवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले.