| पनवेल | प्रतिनिधी |
शहरातील प्रसिद्ध मिरची गल्लीमध्ये उन्हाळा सुरू होताच विविध प्रकारच्या सुक्या मिरच्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. लाल भडक मिरच्यांचे ढीग, मसाला बनवण्याची लगबग आणि दरवळणारा तिखटाचा सुगंध यामुळे संपूर्ण परिसर गजबजला आहे. बाजारात गुंटूर सन्नम, तेजा, बेडगी, काश्मिरी, लवंगी, संकेश्वर, ज्वाला, धनी तसेच कोल्हापुरी लवंगी अशा विविध मिरच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रंगासाठी बेडगी व काश्मिरी मिरचीला मागणी असते, तर जास्त तिखटपणासाठी गुंटूर सन्नम आणि तेजा मिरचीची खरेदी केली जाते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे विशेषतः आंध्र प्रदेशातील मिरची पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर वाढले असून, त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही दिसून येत आहे. तरी ही मसाला तयार करण्यासाठी आणि वर्षभराच्या साठ्यासाठी नागरिकांची खरेदी सुरूच आहे. पनवेलची मिरची गल्ली पुन्हा एकदा लाल तिखटाच्या रंगात न्हाऊन निघाली असून वाढलेल्या किमतींनाही न जुमानता ग्राहकांचा उत्साह कायम आहे.
मिरची गल्लीमध्ये मिरच्यांची रेलचेल
