घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ
| रायगड | प्रतिनिधी |
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभराचा मसाला साठवण्याच्या तयारीत असलेल्या गृहिणींचे आता आर्थिक बजेट कोलमडले आहे. घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे 200 ते 300 रुपयांची मोठी वाढ झाली असून, प्रामुख्याने बेडगी आणि काश्मिरी मिरचीने उच्चांक गाठला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दर 30 ते 40 टक्क्यांनी वधारल्याने ग्राहकांसह व्यापारी वर्गही चिंतेत पडला आहे.
विशेषतः जानेवारी ते एप्रिल हा मिरचीचा मुख्य हंगाम असतो. या काळात दररोज मोठ्या प्रमाणावर मिरची बाजारात येते. मात्र, यंदा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पावसाचे अनियमित प्रमाण आणि उष्णतेची तीव्रता वाढल्याने मिरची पिकावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादन कमी झाले आणि बाजारात मालाची आवक घटली. परिणामी, उपलब्ध मालावरच जास्त मागणी आल्याने दर वाढले. या दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारावरही झाला असून, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या मसाल्यांचा खर्च वाढल्याने स्वयंपाकघराचे बजेट बिघडू लागले आहे. लहान हॉटेल्स, खानावळी आणि मसाला उत्पादकांनाही याचा मोठा फटका बसत आहे. पुढील काही आठवड्यांत नवीन मालाची आवक वाढल्यास दर काही प्रमाणात स्थिर होऊ शकतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत दर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही काळ महागाईचा सामना करावा लागणार आहे.
मसाला उद्योगातील वाढती मागणी
मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मसाले तयार करण्याचे प्रमाण वाढते. घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. लोणचे, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांसाठी मिरचीची गरज वाढल्याने बाजारात मागणीचा ताण निर्माण झाला आहे. वाहतूक खर्चात झालेली वाढ, साठवणुकीचे खर्च आणि व्यापाऱ्यांकडून केले जाणारे साठेबाजीचे व्यवहार यामुळेही दरवाढीला हातभार लागल्याचे बोलले जात आहे. काही व्यापाऱ्यांनी भविष्यात दर आणखी वाढण्याच्या शक्यतेने साठा करून ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे.
मिरचीचा प्रकार सध्याचा दर (रु.)
काश्मिरी मिरची 650 ते 800 रुपये.
कर्नाटक बेडगी 380 ते 420 रुपये.
तेजा / गुंटूर 230 ते 280 रुपये.






