बॅडमिंटनचा उगम भारतातील ब्रिटीश सैनिकी वसाहतींमध्ये झाला आणि 1873 मध्ये त्याचे नियम पुण्यातच तयार झाले. तरीही हा खेळ आपल्याकडे क्रिकेटइतका लोकप्रिय होऊ शकला नाही. किंबहुना, भारतात क्रिकेटमुळे आणि क्रिकेटपुढे बाकीचे सर्व खेळ सदैव झाकोळलेले राहिले. गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये ही स्थिती बदलते आहे. बॅडमिंटनच्या वैयक्तिक प्रकारात सायना व सिंधू यांनी बरीच पदके आपल्याला मिळवून दिली. यातून अनेकांना प्रेरणा मिळून देशात बॅडमिंटनबाबतचे उत्तम वातावरण तयार झाले. रविवारी बँकॉकमध्ये भारताने थॉमस चषक जिंकला तो याच वातावरणाचा परिपाक आहे. या चषकाच्या 73 वर्षांच्या इतिहासामध्ये भारताने आजवर एकदाही अंतिम फेरीदेखील गाठली नव्हती. यंदा ती गाठून थेट चषकावर नाव कोरण्याची ऐतिहासिक कामगिरी भारताच्या पुरुष संघाने केली. या विजयामुळे अनेकांना 1983 मध्ये कपिल देवच्या संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकण्याच्या पराक्रमाची आठवण झाली. या दोन्ही विजयांमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. 1983 पूर्वी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा पराक्रम गाजवले होते. इंग्लंडमध्ये इंग्लंडला आणि वेस्ट इंडिजमध्ये विंडिजला हरवलं होतं. सुनील गावसकरसारख्यांनी वैयक्तिकरीत्या अनेक भीमपराक्रम केले होते. पण विश्वचषकासारख्या स्पर्धेत अनेक संघांविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत निर्णायकरीत्या खेळ उंचावण्याची कामगिरी कधीही केली नव्हती. कपिल देवच्या संघाने ती केली आणि भारतीय क्रिकेटचं चित्र बदलून गेले. बॅडमिंटनमध्येदेखील प्रकाश पदुकोन (1980) आणि पुलेला गोपीचंद (2001) यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेला विजय आणि त्यानंतर सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा तसंच ऑलिम्पिकमध्ये केलेली चमकदार कामगिरी अशा वैयक्तिक पराक्रमांची नोंद आपल्याकडे होती. पण भारतीय बॅडमिंटन संघाला विश्वचषकासारख्या, सर्व देश एकाच वेळी खेळत असलेल्या, स्पर्धेत मोठं यश मिळवता आले नव्हते. आता थॉमस चषक जिंकल्यानंतर भारतीय सांघिक बॅडमिंटनची वाटचाल त्या दिशेने होऊ लागेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. यंदाच्या थॉमस चषकातील भारताची कामगिरी आपल्या सर्वांना अभिमान वाटावी अशी आहे. उपांत्यपूर्व फेरीत आपण चार वेळा विश्वविजेते असलेल्या मलेशियाला हरवलं. तर उपांत्य फेरीत 2016 चे विजेते असलेल्या डेन्मार्कला पराभूत केलं. अंतिम लढतीत आपली गाठ यापूर्वी चौदा वेळा हा चषक जिंकलेल्या इंडोनेशियाशी होती. अर्थातच त्यांच्याविरुध्दचा सामना सोपा नव्हता. एकेरी आणि दुहेरीतील पहिले गेम गमावल्यानंतर आपल्या खेळाडूंनी विजय खेचून आणला. शेवटी किदम्बी श्रीकांतने त्यावर कळस चढवला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत अधिकाधिक सातत्य येईल अशी क्रीडारसिकांची अपेक्षा असेल. सायना, सिंधू, किदम्बी श्रीकांत हे आपले स्टार खेळाडू आहेत. मात्र सलग चढत्या क्रमाने त्यांनी कामगिरी केली आहे असे कालखंड कमी दिसतात. सायनाने 2015 व 2017 मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे ब्रांझ मिळवल्यानंतर तिची कामगिरी घसरत गेली. सिंधूने 2019 मध्ये जागतिक स्पर्धा जिंकल्यावर 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये ब्रांझ पदक जिंकले. त्यानंतर अलिकडे तिला विजयाने सतत हुलकावणी दिली आहे. श्रीकांत 2018 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला. तरी नंतरची त्याची कामगिरी त्याला साजेशी राहिलेली नाही. अर्थात, बॅडमिंटन किंवा टेनिस हे वैयक्तिक क्रीडाप्रकार प्रचंड आव्हानात्मक आणि शरीरासोबत मनाचीही परीक्षा घेणारे असतात. जोकोविच, नदाल, फेडरर किंवा सेरना यांनी एक-दोन दशके मैदाने गाजवणे हे निव्वळ अद्भूत व अविश्वसनीय आहे. सर्वांकडून तशी अपेक्षा करणे चूक आहे. तरीही थॉमस चषकामुळे आता तमाम भारतीयांच्या अपेक्षा उंचावणार आहेत. या विजयामुळे देशात बॅडमिंटनसाठी अधिक अनुकूल वातावरण तयार होईल. गेल्या काही वर्षांपासून पुलेला गोपीचंद यांनी अत्यंत निष्ठेने व चिकाटीने नवनवीन खेळाडू घडवण्याचे जे व्रत घेतले आहे त्याचाही कालच्या विजयात मोठा वाटा आहे. आता गोपीचंद यांच्या प्रयत्नांना अधिक बळ व आर्थिक सामर्थ्य मिळेल. कुस्ती, नेमबाजी या प्रकारांमध्ये आपले खेळाडू गेले काही वर्षे चमकत आहेत. हॉकीतही आशा वाढल्यात. थॉमस चषकातील यशाने बॅडमिंटनच नव्हे तर इतरही अनेक खेळांमधील आपल्या प्रयत्नांना एक नवी ऊर्जा मिळावी.
ऊर्जा देणारा विजय

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025