। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागचे शिंदे गटाचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून मिळणार्या वागणूकिमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून मिळणार्या शिव्यांमुळे कार्यकर्ते बेजार असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवीत आता आमदार पत्नींचीही जीभ घसरत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. मानसी दळवींनी अतिशय वाईट पद्धतीने पदाधिकार्यांना अपशब्द वापरल्याचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अलिबाग-रोहा मार्गावर दोन्ही मित्रपक्षांनी केलेल्या नारळफोडीच्या कार्यक्रमाप्रसंगावेळी काढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मित्रपक्ष असतानाही अलिबाग-रोहा रस्त्याच्या श्रेयासाठी काही दिवसांपूर्वीच मानसी दळवी व भाजपचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. श्रेयासाठी मानसी दळवींली दिलीप भोईर यांना खडेबोल सुनावले होते. यावर कोणतीही तिखट प्रतिक्रिया न देता भोईर यांनी मित्रपक्षाला सावरुन घेतले. मात्र पुन्हा एकदा शिंदे गट-भाजप आमने-सामने आले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील नारळफोडीच्या कार्यक्रमाप्रसंगी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना भर चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मानसी दळवींनी अतिशय गलिच्छ शब्दांत सुनावल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. ते ऐकून क्षणभर उपस्थितांनाही लाज वाटली. त्या घटनेचा व्हिडियो सध्या तुफान व्हायरल होत असून नागरिकांनी अशा लोकप्रतिनिधीच्या हाती सत्ता दिल्याचा पश्चाताप व्यक्त केला आहे.