पोलीस तपासात उघड;आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील काशीद परिसरात गुरुवार दिनांक 6 एप्रिल2023 रोजी आलेल्या आई व मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर मुरूड तालुक्यासहित जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होता. काशीद समुद्रात डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय 73) आणि विजय लिओनेल अल्फ्रेड (वय 46) हे दोघेही कल्याण येथील टीएमसी शाळेजवळ दहीघर गाव शिळासती येथील रहिवासी असून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे मुरूड पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुरूड पोलिसांनी सांगितले की, डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय 73) आणि विजय लिओनेल अल्फ्रेड हे दोघेही मूळचे तामिळनाडू येथील असून ते काही वर्षांपासून कल्याण येथील टीएमसी शाळेजवळ दहीघर गाव शिळासती येथे वास्तव्यास आहेत.मृत विजय लिओनेल अल्फ्रेड ह्याची कोव्हिडं काळात नोकरी गेली होती तसेच दुसरी नोकरी शोधली होती.मात्र काही कारणास्तव ती सुद्धा गेल्याने त्यांना आर्थिक टंचाई भासू लागली.आर्थिक टंचाई भासू लागल्याने या दोघांनीही आत्महत्येचा विचार करून गुरुवार दिनांक 6 एप्रिल2023 रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरुन ते काशीद येथे निघाले.निघण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील वस्तू ह्या विजयच्या मैत्रिणीकडे दिल्या होत्या.मैत्रिणी चा समज झाला की विजय आणि त्याची आई ही गावाला जात असल्याने त्या वस्तू तिच्याकडे ठेवण्यास दिल्या आहेत. त्याच प्रमाणे विजय याने आत्महत्येपूर्वी त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप हा फॉरमॅट करून ठेवला होता.
डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय 73) आणि विजय लिओनेल अल्फ्रेड (वय 46) अशी मृतांची नावे आहेत. कल्याण दहीघर येथील रहिवासी असलेले हे माय-लेक चार चाकी गाडी घेऊन काशिद येथे आले होते. ते 6 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 पूर्वी चिकणी समुद्र किनार्यावरील कावडा नावाने ओळखल्या जाणार्या भागात बुडाले. त्यांना तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी नोंद पोलिसांनी केली आहे.
मयतांजवळ असणार्या आधार कार्डवरून पोलिसांनी त्या पत्त्यावर चौकशी केली असता त्यांचे कोणीही नातेवाईक आढळून आले नाहीत. विजय आणि त्याची आई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून त्यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क तोडून टाकले आहेत.त्यामुळे त्यांचे मृतदेह कोणीही ताब्यात न घेतल्याने त्यामुळे या दोघांचे मृतदेह वाशी येथील शवगृहात ठेवण्यात आले आहेत.