उरण शहरातील जलवाहिनी फुटली

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहर, परिसरातील गावे व प्रकल्पांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीच्या रानसई धरणातील मुख्य जलवाहिनी गुरुवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास फुटली. त्यामुळे या सर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ही मुख्य वाहिनी जीर्ण झाल्याने ती फुटली असून, दोन तासांत जवळपास हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, ही जलवाहिनी 15 फुट खाली असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

उरण शहर, परिसरातील गावे व ओएनजीसीसह इतर प्रकल्पांना पाणीपुरवठा हा एमआयडीसीच्या रानसई धरणातून करण्यात येते. गुरुवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास 900 मिली मीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ही जलवाहिनी दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या जवळ 15 फुट खाली असल्याने जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम शनिवारी (दि.24) पुर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version