| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा नदीकिनार्यावरील गजानन महाराज मंदिराजवळील नदिपात्रात दोन-अडीच एकरपेक्षा जास्त जलपर्णीचे जाळे पसरले असल्याने पाताळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणार्या आदिवासी व भोई बांधवांत नाराजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाण्यावर जलपर्णीचे रान माजल्याने जणूकाही खेळाचे मैदान असल्याचे वाटू लागले आहे. पाण्यावर असलेली ही जलपर्णी पाहून जंगल निर्माण झाल्याचा भास पाहणार्यांना होत आहे.
दरम्यान, गजानन महाराज मंदिराजवळ पाताळगंगेतील पाणी अडविले जाते. परंतु, जलपर्णी वनस्पतीमुळे पाण्याचा प्रवाहावर परीणाम होत असून, या जलपर्णीत लहान जीव मृत होऊन अडकून बसतात. या भागात जलपर्णी वनस्पती पाण्यात पसरल्याने, नदी न वाटता एखादे मोठे खेळाचे मैदान असल्याचा भास होत आहे. यामुळे मासेमारी व्यवसाय करणार्यांना या जलपर्णीमुळे मासेमारी करणे धोक्याचे झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कठीण होऊन बसला असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.