| रसायनी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद भाताण शाळेच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ विकण्याचा आरडा ओरडा गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांच्या विविध नकला करत रायगड जिल्हा परिषद शाळा भाताण येथे पाहायला मिळत होत्या. येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणातच आठवडा बाजार भरवला होता. यावेळी गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,कला,क्रीडा, क्षेत्रातील अनेक नागरिकांनी वयोवृद्धांनी युवकांनी शाळेत येऊन एक दिवशीय आठवडा बाजारातील सकाळी सकाळी नाश्त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ घेऊन जात होते.
भाताण परिसरातील लहान चिमुकल्यांनी पावट्याच्या शेंगा, पाणीपुरी, वडापाव, चहा, भेळ, चिंचा असे विविधप्रकारचे खाद्य पदार्थ बनवून घेऊन ते त्या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येत होते. शाळेत आठवडी बाजार भरला होता गावकऱ्यांनी आठवडी बाजाराला गर्दी केली होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मालकरांनी मुलांना फक्त शालेय ज्ञान देण्यापेक्षा सभोवतालच्या समाजाने व्यवहारिक ज्ञानाची माहिती व्हावी आणि अशा उपक्रमातून मुलांना शिकताना गोडी निर्माण व्हावी व दैनंदिन जीवनातील व्यवहाराचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी हा आठवडा बाजार भरवला असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षिका राखी सावंत, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, तानाजी पाटील, सुभाष भोईर, व ग्रामस्थ महिला मंडळ युवक वर्ग मोठ्या संख्येने एक दिवशीय आठवडा बाजारात खरेदीसाठी हजर होते.