| जयपूर|वृत्तसंस्था|
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. राजस्थानमध्ये भाजपाने काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले आहे. या ठिकाणी दर पाच वर्षांनी सत्तांतर होत असते. तोच ट्रेंण्ड या वर्षी देखील दिसून आला. भाजपाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. भाजपाचे 114 जांगावर उमेदवार निवडूण आले आहेत, तर काँग्रेस 71 जागांवर विजयी झाली. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फटका बसल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना सत्ता राखण्यात यश आले नाही. या ठिकाणी भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. तसेच वसुंधराराजे यांना देखील भाजपाने बाजूला केले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच निवडूण लढवण्यात आली होती. मतदानानंतर जाहीर झालेल्या कल चाचण्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी झुंज होणार असल्याचे स्प्ाष्ट झाले होत. मात्र ते सर्व खोटे ठरवत भाजपाने जबरदस्त मुसंडी मारली आहे.
एकूण जागा-199
बहुमत – 100
भाजपा – 115
काँग्रेस – 69
अन्य – 15
आम्ही या तात्पुरत्या बसलेल्या धक्क्यातून लवकर सावरू आणि आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीसह पूर्ण सज्ज राहू.
मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष
एक्झीट पोल हरले
| मध्यप्रदेश | वृत्तसंस्था |
मध्यप्रदेशमध्ये 2018 चा दीड वर्षांचा अपवाद वगळता 2003 पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी 16 वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र, सर्व कल चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत मध्यप्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली, तर काँग्रेस पिछाडीवर पडली. 230 विधानसभा मतदारसंघांच्या या राज्यात बहुमताचा जादुई आकडा 116 इतका आहे. तो भाजपाने सहजपणे पार केला आहे.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा 167 जागां जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 62 जागांवर विजय मिळवता आला. इतर पक्षांमध्ये बहुजन समाज पक्षाला आपले खातेही खोलात आले नाही. तर एक अपक्ष आमदार निवडून आला आहे. निकालाच्या आकडेवारीवरून 230 विधानसभा मतदारसंघ असलेल्या मध्यप्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली आहे. असं असलं तरी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री केल्यास ते राज्यात पाचव्यांदा मुख्यमंत्री होतील. मात्र, त्या व्यतिरिक्त ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, व्हीडी शर्मा आदींची नावेही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. ही नावे चर्चेत असली तरी शिवराज सिंह चौहान यांना पार्टी दुखावणार नसल्याचंही सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना दिलं आहे. राज्यात मोदी यांच्या प्रचंड सभा झाल्या. लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. लोक त्यांच्याशी जोडले गेले. त्यामुळे आज निकाल वेगळा लागला आहे. केंद्रातील मोदी सरकारने जे काम केलं आहे. ज्या योजना आणल्या त्याची आम्ही योग्यप्रकारे अंमलबजावणी केली. आम्ही राज्यात लाडली लक्ष्मीपासून ते लाडली बहनपर्यंतच्या योजना लागू केल्या. लोकांना त्या आवडल्या. याचवेळी गृहमंत्री अमित शाह यांनीही आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांनी निवडणुकीला दिशा देण्याचं काम केलं. तसेच आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळेच आम्ही विजयी झालो, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
एकूण जागा-230
बहुमत-116
भाजपा-163
काँग्रेस-66
अन्य-1