सिव्हिलमधील एक खिडकी ठरतेय त्रासदायक

औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईंकांचे हाल

| अलिबाग । प्रतिनिधी।

उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना चांगली सेवा मिळावी. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन कटिबध्द असल्याचे फक्त कागदावर असल्याचे चित्र दिसून आले आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात औषधे घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांसाठी पुरुष, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, स्त्रीया, मुले यांच्यासाठी स्वतंत्र तीन खिडक्यांची सोय केली असताना एकच खिडकी चालू ठेवण्याचा प्रकास समोर आला आहे. त्याचा नाहक त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावे यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत बाह्यरुण विभाग सुरु करण्यात आला आहे. या विभागात शहरी भागासह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. परंतू डॉक्टरांचा तुटवडा असल्याने रुग्णांना तासनतास डॉक्टरांची वाट पहावी लागत आहे. त्यात डॉक्टरांनी तपासणी केल्यावर लिहून दिलेली औषधे घेण्यासाठी स्वतंत्र औषध भंडार केंद्र सुरु केले आहे. या केंद्रामध्ये पुरुष, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व दिव्यांग तसेच स्त्रिया मुले यांच्यासाठी स्वतंत्र खिडकी सुरु केली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून फक्त पुरुष खिडकीच सुरु ठेवली जात आहे. याच खिडकीतून रुग्णांना उपचारासाठी औषध घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकच खिडकी चालु असल्याने महिलांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाचा नाहक त्रास होत आहे. औषधांसाठी कित्येक वेळ उभे राहण्याची वेळ या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवर येत आहे. रुग्ण प्रशासाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका मुले, महिला, स्वातंत्रसैनिक, दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. रुग्ण प्रशासनाच्या या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.

सिटीस्कॅन मशीनच्या इंजिनमध्ये बिघाड
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात गावागावातून, खेड्यापाड्यातून हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामध्ये काही रुग्ण डोक्याला दुखापत झालेले येतात. रिलायन्स कंपनीने जिल्हा सामान्य रुग्णालयाला सिटीस्कॅन मशीन भेट दिले. रुग्णालयात उपचारासाठी गोरगरीबांना चांगली सेवा मिळावी यासाठी रिलायन्स कंपनीकडून गेल्या सहा वर्षापुर्वी सिटीस्कॅन मशीन सामाजिक बांधिलकीतून देण्यात आली. या मशीनद्वारे दिवसाला शंभर रुग्णांची तपासणी केली जात असून कोरोना काळात शंभर रुग्णांची तपासणी केली जात होती. डोके, मेंदू तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात तीनशे रुपये व इतर तपासणीसाठी 400 रुपये घेतले जातात. मात्र पिवळे शिधापत्रिका धारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना मोफत सेवा दिली जात आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून सिटीस्कॅन मशीन बंद पडले आहे. दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ गेल्या आठ दिवसापूर्वी आले होते. या मशीनमधील मास बोर्ड नावाचे इंजिन बिघडले आहे. बिघडलेल्या इंजिनऐवजी नवीन इंजिन बसविण्याची गरज आहे. जर्मनमध्ये हे इंजिन तयार करणअयात आले असून ते मागवण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता तेथील प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून ही मशीनमधील इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्याचा नाहक त्रास रुग्णांना होत आहे.आर्थिक भुर्दंड रुग्णांच्या नातेवाईकांना बसत आहे.

Exit mobile version