आशिया चषकाचा विजयारंभ

भारताकडून पाकिस्तानच्या चारीमुंड्या चित

| डंबुला | वृत्तसंस्था |

महिला आशिया कप 2024 स्पर्धेतील दुसरा सामना शुक्रवारी (दि.19) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेतील हा दोन्ही संघांचा पहिला सामना होता. त्यामुळे भारताने या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात विजयाने केली, तर पाकिस्तानची सुरुवात पराभवाने झाली आहे. तसेच, भारतीय महिला संघाचा हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 100 वा विजय ठरला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 14.1 षटकात 3 बळी गमावत सहज पूर्ण केला. या सामन्यात भारताकडून सलामीला आलेल्या शफली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात केली. काही चांगले आक्रमक शॉट्सही या दोघींनी खेळत सलामीला 85 धावांची भागीदारी रचली. मात्र, दोघींचेही अर्धशतक थोडक्यात हुकले. दहाव्या षटकात मानधनाला सईदा अरुब शाहने बाद केले. स्मृतीने 31 चेंडूत 45 धावा केल्या. तसेच, 12 व्या षटकात शफलीला सईदाने 40 धावांवर त्रिफळाचीत केले. पण तोपर्यंत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला होता. मात्र, यादरम्यान तेराव्या षटकात दयालन हेमलता 14 धावांवर बाद झाली. पण अखेरीस भारताच्या विजयाची औपचारिकता कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रोड्रिग्सने पूर्ण केली. हरमनप्रीत 5 धावांवर आणि जेमिमाह 3 धावांवर नाबाद राहिल्या. पाकिस्तानकडून सईदाने 2 बळी, तर नशरा संधूने 1 बळी घेतला.

तत्पुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानचा संघ 19.2 षटकात 108 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 25 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त केवळ तौबा हसन आणि फातिमा सना या दोघींनाच 20 धावांचा टप्पा पार करता आला. या दोघींनीही प्रत्येकी 22 धावा केल्या. तसेच, मुनीबा अलीने 11 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्माने सर्वाधिक 3 बळी घेतले. तसेच, पुजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकुर आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

सर्वाधिक धावा
या सामन्यात भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 45 धावा केल्या, त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमध्ये मानधाना आता सर्वाधिक धावा करणारी भारतीय ठरली आहे. तिने हरमनप्रीत कौरला मागे टाकत हा विक्रम केला आहे. मानधनाच्या आता 137 टी-20 सामन्यांत 3365 धावा झाल्या. तर, हरमनप्रीतने 3349 धावा केल्या आहेत.
विक्रमी भागीदारी
या सामन्यात मानधना आणि शफाली यांनी 85 धावांची सलामी भागीदारी या सामन्यात केली. त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारी करताना 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारीत 4000 धावा करणारी त्यांची तिसरीच जोडी ठरली. यापूर्वी एलिसा हेली व बेथ मुनी आणि सुझी बेट्स व सोफी डिवाईन या दोन जोड्यांनी यापूर्वी असा विक्रम केला आहे.
Exit mobile version