| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर चोराने सानपाडा येथे राहणार्या 65 वर्षीय महिलेला एक लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत फसवणूक झालेली 65 वर्षीय महिला सानपाडा येथे मुलासह राहते. तिच्या मालकीचा मुंबईतील सायन भागात एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी त्यांनी वेबसाईटवर जाहिरात टाकली होती. हीच जाहिरात बघून रणदीप सिंग नामक व्यक्तीने या महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. त्यावेळी आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून त्यांचा सायन येथील फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी इच्छुक असल्याचे महिलेला सांगितले होते. तसेच फ्लॅटचा करारनामा करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र पाठवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रणदीप सिंग याने डिपॉझिटची रक्कम इंडीयन आर्मीच्या अकाऊंटवरुन पाठवणार असल्याचे सांगून मासिक भाड्याची रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने महिलेकडून युपीआय आयडीची मागणी करून दोन लिंक पाठवून दिल्या. पण या दोन्ही लिंक उघडल्यानंतर महिलेच्या बँकेतून एक लाखाची रक्कम काढून घेण्यात आली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.





