लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक

| पनवेल । वार्ताहर ।

जादा नफ्याचे आणि घरबसल्या लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून क्यू-नेट सारख्या वादग्रस्त मनी सक्युलेशन स्कीमद्वारे एका सुशिक्षित विवाहित महिलेची 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या विवाहितेच्या कॉलेज मित्रानेच ही फसवणूक केली आहे. अभिषेक संजय झगडे (31) असे त्याचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच क्यू-नेटच्या या जाळ्यात आणखी कोणी फसले आहे का, याचा तपास सुरू केला आहे.

30 वर्षीय तक्रारदार विवाहिता खांदा कॉलनी येथे राहणारी असून, ती तळोजा एमआयडीसीतील एका कंपनीत काम करते. जून 2024 मध्ये या विवाहितेचा कॉलेज मित्र अभिषेक झगडे याने तिची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने क्यू-नेट ग्लोबल कंपनीत पार्टनरशिपमध्ये काम करत असल्याचे व त्याला गेल्या महिन्यात 70 हजार रुपये नफा मिळाल्याचे त्याने या विवाहितेला सांगितले. तसेच लहान मुलाला सांभाळून घरबसल्या 10 ते 20 हजार रुपये कमवता येऊ शकतात, असे आमिष त्याने तिला दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या विवाहितेने नोव्हेंबर 2024 मध्ये म्युच्युअल फंडातील 3 लाख 70 हजार रुपये काढून ते अभिषेकला दिले. हे पैसे मिळाल्यानंतर त्याने तिला बनावट ई-मेल आयडी तयार करून त्यावरून 3 लाख 52 हजार 590 रुपयांची निरुपयोगी उत्पादने तिच्या नावावर खरेदी केली. मात्र, ती तिला कधीच मिळाली नाहीत. त्यानंतर पनवेलमधील ओरियन मॉल येथे या कंपनीच्या मीटिंगसाठी विवाहिता गेली असताना, तिला झोन तयार करण्याच्या नावाखाली नातेवाईकांकडून जबरदस्तीने दोन लाख रुपये मागण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे तिला संशय आल्याने तिने अभिषेककडे गुंतवणूक केलेल्या पैशांची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे या विवाहितेच्या लक्षात असल्यानंतर तिने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version