। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे शहरात सेक्टर 10 परिसरात भटक्या कुत्र्याने लहान मुलांसह अनेक नागरिकांना चावून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पनवेल महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाने नागरिकांच्या मदतीने त्या कुत्र्याला पकडले. लहान मुलांवर हल्ला करणाऱ्या कुत्र्याला अडवून मुलांना वाचविण्यासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
पनवेलमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण आहेत. पिसाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या अनेकांवर हल्ला केला. एका लहान मुलावरही त्याने हल्ला केला. ते पाहून जागृक नागरिक कृष्णाजी म्हात्रे (64) यांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. पिसाळलेल्या कुत्र्याला ते बाजूला करत होते. तरीही हा कुत्रा इतर लहान मुलांवर हल्ला करीत होता. या झटापटीत म्हात्रे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच इतर काही जणांना जखमा झाल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या पशूवैद्यकीय कळवल्यानंतर रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या चावणाऱ्या कुत्र्याचा शोध सुरू होता. मदतीने दोन कुत्र्यांना तांब्यात घेऊन पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्रात निरीक्षणासाठी ठेवले आहे. या घटनेनंतर आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत, असे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. मधुलिका लाड यांनी सांगितले. कामोठ्यात विशेष मोहीम राबवून कुत्र्यांवर नजर ठेवली जाईल, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.






