। मुंबई । प्रतिनिधी।
मोटरगाडी चालविण्यास शिकत असताना धडक लागून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोटार चालविण्यास शिकविणारा आणि शिकणाऱ्या अशा दोघांनाही कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.
कांदिवली परिसरात सुरेंद्र गुप्ताला त्याचा मित्र राजेंद्र हा मोटार चालविण्यास शिकवत होता. सुरेंद्रकडे मोटरगाडी चालविण्याचा परवाना नसतानाही तो विनापरवाना मोटर चालवत होता. माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सुरेंद्रने ब्रेकऐवजी जोरात एक्सलेटर दाबला. त्यामुळे मोटर वेगात पुढे जाऊन रस्त्यावरून जाणार्या एका वृद्ध महिलेसह दोघांना धडक दिली. या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर, दोघे जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलीस घटनास्थळी हजर झाले. जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी राजेंद्र गुप्ता व सुरेंद्र गुप्ताला अटक केली आहे.







