मानसिक कणखरतेची लढाई जिंकणाराच विश्‍वविजेता

टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 2022 चा विश्‍वविजेता निश्‍चित करण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड आणि जगभरातील तमाम क्रिकेट रसिक सज्ज झाले आहेत. मात्र क्रिकेट हा खेळ एखादी ट्रॉफी, करंडक, किंवा विश्‍वविजेतेपद यापुरता मर्यादित राहिला नाही. समाजातील विषमता, द्वेष, दरी दूर करण्यासाठीचे क्रिकेट हे प्रभावी माध्यम ठरत आहे. आज पाकिस्तान हा देश फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इम्रानखानला पदच्च्युत केल्यापासून राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. पंजाबमधील वजनदार मुस्लिम कुटुंबांच्या हाती लष्कराच्या प्रगतीच्या आणि सत्तेच्या नाड्या आहेत. जनता द्विधा मन:स्थितीत आहे. अशावेळी दुंभगलेल्या समाजाला एकत्र सांधणारा क्रिकेट हा महत्त्वाचा दुवा ठरु शकतो. नैराश्य आणि वैफल्यावस्थेत जगणारा समाज पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या अंतिम फेरीतील प्रवेशानंतर उत्तेजित झाला आहे. त्यांच्या जीवनात क्रिकेटमधील संभाव्य विश्‍वविजेतेपदाचा आशावाद नव्याने निर्माण झाला आहे. सद्य:परिस्थितीत इम्रानखानला जनतेचा पाठिंबा आहे. मात्र लष्कर नियंत्रण राखून आहे. या दोन दोघांमधील संघर्षावर, पाकिस्तान संघाने उद्या इंग्लंडवर मात करुन विश्‍वचषक जिंकल्यास एक उतारा किंवा उपाय मिळू शकेल. पाकिस्तानच्या जनतेला विजेतेपद नवी उभारी देऊ शकेल.

दुसरीकडे जोस बटलरच्या रुपात क्रिकेटच्या जन्मदात्यांना एक नवा लिडर मिळू शकेल. इऑन मॉर्गनने 50 षटकांच्या क्रिकेटचे विश्‍वविजेतेपद इंग्लंडला मिळवून दिले होते. बटलरने टवेन्टी-20 क्रिकेटचे विश्‍वविजेतेपद इंग्लंडला मिळवून दिल्यास तो देखील एक दुर्मिळ संयोग ठरु शकेल. 50 व 20 षटकांचे विद्यमान विजेते होण्याचा तो एक दुर्मिळ योगायोग ठरु शकतो.

मात्र 50 षटकांच्या क्रिकेटपेक्षा 20 षटकांचे क्रिकेट हे चमत्कारीक आहे याचा अनुभव जवळजवळ सर्वच संघांना या स्पर्धेत आला आहे. उपांत्यफेरीत भारताला सपशेल चीत करणार्‍या इंग्लंडची आर्यलंडविरुद्ध साखळी सामन्यात कोंडी झाली होती. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे निश्‍चित करण्यात आलेले विजयाचे लक्ष्य त्यांना गाठता आले नाही. कारण इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांना वेगात धावा काढताच आल्या नाहीत. बटलर-हेल्स जोडीचे आक्रमक स्वरुप मधल्या फळीतील फलंदाजांना अद्यापी धारण करता आले नाही. या स्पर्धेत मधल्या फळीने सर्वांनी मिळून फक्त एकच षटकार मारला आहे.
मेलबर्नमध्ये रविवारी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या व्यत्ययाचा तोटा नेमका कुणाला होतो यावर देखील या अनिश्‍चिततेच्या स्वरुपातील क्रिकेटचे विजेतेपद उद्या निश्‍चित होईल.

टवेन्टी-20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात कलकत्ता येथे धावांची लयलूट करुन देणारा बेन स्टोक्स त्यानंतरच्या 50 षटकांच्या विश्‍वचषक विजेतेपदाचा शिल्पकार ठरला होता. क्रिकेट हा खेळ सर्वांन सारख्या पातळीवर आणून सोडतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पाकिस्तानविरुद्ध लढतीत डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यास इंग्लंडला सध्या सॅम करनच्या रुपात चांगला गोलंदाज मिळाला आहे. हार्दिक पंड्याच्या बॅटचा प्रहार वगळता यंदाच्या विश्‍वचषकात त्याच्या गोलंदाजीला कुणालाही मुक्त फटकेबाजी करता आली नाही. बटलर अ‍ॅलेक्स हेल्स ही सलामीची जोडी आणि करन यांच्याकडून इंग्लंडच्या अंतिम सामान्यातही अपेक्षा आहेत. याउलट दुसरीकडे, जवळजवळ स्पर्धेतून बाद झालेल्या पाकिस्तान संघाला, हॉलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन संजीवनी दिली. मात्र त्यांच्या फलंदाजीची मदार, कप्तान बाबर आझम, महंमद रिझवान यांच्यावरच अधिक आहे. गोलंदाजीत मात्र पाकिस्तान संघ इंग्लंडपेक्षा काकणभर सरस वाटतो. शाहीन आफ्रिदी, मेलबर्नमध्ये खेळणारा हॅरिस रॉफ, आणि त्याच्या साथीला महंमद नवाझची फिरकी असा प्रभावी मारा त्यांचा आहे. मात्र अंतिम फेरीच्या सामन्याचे दडपण, नाणेफेकीचा निर्णायक कौल आणि पावसाळी हवामान यामुळे मानसिक कणखरतेच्या लढाईत विजयी होणारा संघच यावेळी विश्‍वविजेता होणार हे निश्‍चित.

Exit mobile version