आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान हरपला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राष्ट्रकूल स्पर्धेचे पदक विजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी निंगाप्पा चिंगळी यांचे रविवारी (दि.21) निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. सांबरा येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना कुस्तीची फारच आवड होती. गावातील महादेव व्यायाम मंडळाच्या तालमीत ते सराव करत होते. परिसरात आयोजित कुस्ती मैदानात त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. कुस्तीची आवड जोपासण्यासाठीच 1971 मध्ये बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शिपाई म्हणून ते भरती झाले. मराठा सेंटरमध्ये नामवंत वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे बारकावे आणि तंत्र आत्मसाद केले. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्यांची राष्ट्रकूल स्पर्धेसाठी निवड झाली. न्यूझीलंडमध्ये 1974 मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी चमक दाखवली. त्या पाठोपाठ इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कुस्ती अवघ्या एक गुणाने गमावली. पण, या पराभवाने निराश न होता सराव सुरूच ठेवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय पातळीवर 10 सुवर्ण, तर सर्व्हिसीसच्या स्पर्धेत 14 सुवर्णपदके पटकावली.

पतियाळा (पंजाब) येथील क्रीडा संकुल केंद्रात कुस्ती प्रशिक्षकाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांना आधुनिक पध्दतीचे कुस्तीचे धडे मिळाले. त्यामुळेच ते बेळगाव सेंटरमधील पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देत होते. दिल्लीतील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी सेवा बजावली. सध्या ते बेळगावच्या दर्गा तालमीत वस्ताद म्हणून सेवा बजावत होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

Exit mobile version