| पनवेल | वार्ताहर |
सेक्टर-7 मधील कोस्मो को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणार्या एका 35 वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादाला कंटाळून राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केली.
सौरभ मिश्रा असे या तरुणाचे नाव असून, त्याने राहत्या घरात ’सेल्फोस’ नावाची विषारी पावडर घेतल्याचे समोर आले. 2022 मध्ये सौरभचा विवाह झाला होता, मात्र काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. तेव्हापासून तो मानसिक तणावाखाली होता. 2 फेब्रुवारी रोजी त्याचे आई-वडील गावी गेलेले असताना, त्याने विषारी पावडर प्राशन केली. त्याचे आई-वडील गावाहून परतले असता, त्यांना सौरभ बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, त्यांना तिथे विषारी पावडरची बाटली आणि एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत सौरभने अत्यंत भावुक शब्दांत आई-वडिलांची माफी मागितली आहे. कोर्टात सुरू असलेल्या केसमध्ये माझी काहीही चूक नाही, तरीही मला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा उल्लेख त्याने चिठ्ठीत केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.





