। पनवेल । वार्ताहर ।
ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 56 लाख 20 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय श्रीवास्तव हे सेवानिवृत्त असून, त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक वेब लिंक दिसली. त्यांनी या लिंकवर क्लिक केल्याने ते या ग्रुपमध्ये जोडले गेल्याने त्यांनी ऑनलाइन पैसे पाठवण्यास सुरुवात करून शेअर्स खरेदी विक्री केली. गुंतवणूक झालेला नफा वेबसाईटवर दिसत होता. त्यावर त्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक आणि होणारा फायदा दर्शवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर थोडे थोडे करुन 56 लाख 20 हजार रुपये पाठवल्यानंतर झालेला नफा 1 कोटी 50 लाख इतका दिसत होता. रक्कम काढण्यासाठी प्रोसेस केली असता विनंती अमान्य करण्यात आली आणि टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले आणि पुन्हा पैशाची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.







