कळंब येथे पोश्री नदीत तरुण गेला वाहून

15 दिवसातील दुसरी घटना

नेरळ | वार्ताहर |                   

कर्जत तालुक्यातील पोश्री नदीत कपडे धुण्यासाठी आलेला आदिवासी तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.मागील 15 दिवसातील ही दुसरी घटना असून 18 जुलै रोजी नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अद्याप सापडला नाही.दरम्यान,सकाळी नऊ दरम्यान वाहून गेलेल्या आदिवासी तरुणाचा शोध पोलीस आणि स्थानिक घेत आहेत.                             

कळंब गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या पोश्री नदी सतत सुरू असलेल्या पावसामुळे काठोकाठ भरून वाहत आहे.कळंब कातकरी वाडीमधील शशी भिवा वाघमारे-30 हा तरुण कपडे धुण्यासाठी आपल्या दोन मित्रांसह पोश्री नदीवर आला होता.साडेआठ च्या सुमारास वाडीमधून हे तिन्ही तरुण नदीवर येण्यासाठी निघाले होते.या भागात सतत पाऊस सुरू असल्याने नदीमध्ये असलेले दगडाचे खडक हे हिरव्या रंगांच्या शेवाळ तयार झाल्याने चिकट झाले आहेत.पाण्याच्या कडेला बसून कपडे धुण्यासाठी शशी नदीमधील दगडावर बसणार तोच त्याचा पाय चिकट झालेल्या शेवाळ वरून निसटला आणि शशी वाघमारे हा पाण्यात कोसळला.त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही मित्रांनी लगेच पाण्यात उड्या मारून शशी ला शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काहीवेळ शोध घेऊन ते दोघे तरुण पाण्याच्या बाहेर आले आणि स्थानिकांना सांगायला गेले.त्यानंतर कळंब, पोही, पोशिर, चिकनपाडा येथील अनेक ग्रामस्थ पोश्री नदीच्या किनारी शशी भिवा वाघमारे या तरुणाचा शोध घेत आहे.नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बांगर,कळंब आऊट पोस्टचे उपनिरीक्षक केतन सांगळे,तसेच अन्य पोलीस हे पोश्री नदीच्या कडेला पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत.                               

या पोश्री नदीवर कळंब पुलाच्या आजूबाजूला 200 मीटर मध्ये मागील 15 दिवसातील हा दुसरा तरुण नदीत पडून पाण्यात वाहून गेला आहे.आज 5 ऑगस्ट रोजी वाहून गेलेल्या आदिवासी तरुणाला पत्नी,दोन मुले आहेत,तर 18 जुलै 2021 रोजी वाहून गेलेल्या देवपाडा येथील प्रमोद जगन जोशी या तरुणाचे तर लग्न देखील झाले नव्हते.देवपाडा गावातील तरुणाचा मृतदेह आजपर्यंत स्थानिकांना आणि पोलिसांना सापडू शकला नाही.तर याच कळंब पुलाच्या भागात गतवर्षी 26 वर्षीय विवाहित महिला कपडे घुवायला आली असता पाण्यात पडून वाहून गेली होती.अशा प्रकारे तीन जण पोश्री नदीत एकाच भागातून पाण्यात वाहून गेले आहेत.

Exit mobile version