| आगरदांडा/कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड आगारातून सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी सुटलेल्या मुरुड-आगरदांडा एसटीला खोकरी वळणावर अपघात झाला. या अपघातात 11 शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोकरी ते आगरदांडा हा अरुंद रस्ता वारंवार अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित बांधकाम खाते आतातरी याकडे लक्ष पुरवून ठोस उपाययोजना करेल काय, असा सूर जनमानसातून उमटत आहे.
मुरूड आगाराची मुरूड-आगरदांडा-मुरुड एम.एच.14 बी.टी.1592 ही गाडी चालक संतोष शिकारे व वाहक समीधा मुकादम यांच्यासह अंजुमन इस्लाम हायस्कूल व डिग्री कॉलजेचे पंधरा विद्यार्थी प्रवास करीत होते. आगरदांडा येथून सकाळी आठ वाजता सुटून खोकरी वळणावर आली असता समोरून भरधाव येणार्या चारचाकी वाहनाला साईड देताना पावसामुळे तसेच याठिकाणी रस्त्याच्या कडेला पाण्याची पाइपलाइनच्या कामात माती आल्याने अचानक घसरुन पलटी झाली. गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते. यात आगरदांडा येथून मुरुड शाळेत येणार्या अकरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलीस निरीक्षक उदय झावरे व सहाय्यक पोलीस हवालदार दिपक राऊळ आदींसह पोलिस कर्मचारी येऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच अंजुमन इस्लाम हायस्कूलचे प्राचार्य जाहिद गोठेकर, चेअरमन रहिम कबले, डिग्री कॉलजेचे प्राचार्य डॉ. साजिद शेख, ऋषिकांत डोंगरीकर, आगरदांडा सरपंच आशिष हेदुळकर, श्रीकांत सुर्वे, कुणाल सतविडकर, रूपेश जामकर, जखमी विद्यार्थ्यांचे पालक आदींसह हिंदू, मुस्लिम ग्रामस्थांनी रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रफुल्ल धुमाळ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार केले. त्यापैकी इब्राहिम सवाईल इयत्ता 7 वी, आयेशा कादरी 13 वी, नबा गझगे 12 वी, सामिया स्वारी 11 वी या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर सात जणांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, एसटी चालक संतोष सिकारे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास चालू आहे.
जखमी विद्यार्थ्यांची नावे
इब्राहिम सवाईल इयत्ता 7 वी, सामीया सवाईल 11 वी, रफजा सोंडे 14 वी, अर्श गझगे 14 वी, नबा गझगे 12 वी, आयेशा कादीरी 13 वी, हानिया अन्वारे 11 वी, जैनब खतीब 11 वी, रजीन सोंडे 14 वी, सानिया खतीब 11 वी, सायमा कादरी 11 वी. हे सर्व विद्यार्थी आगरदांडा गावातील रहिवासी आहेत.