नवी मुंबईतील तरुणाचा पाषाणे धरणात बुडून मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

नवी मुंबई येथील दिघा गावातील वसाहतीत राहणारे अजय रावत हे आपल्या चार मित्रांसह कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते. भोजन करून अंघोळीसाठी जवळील लघुपाटबंधारे प्रकल्प असलेल्या धरणावर गेले असता, अजय हा खोल पाण्यात गेल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाला. ही घटना शनिवारी (दि.10) दुपारी तीन वाजता घडली आणि आज रविवारी सकाळी नऊ वाजता त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.   

दिघा गावातील अजय रावत हे वाहतूक व्यवसाय करतात. त्यातील टुरिस्ट कार घेऊन आपल्या चार मित्रांसह कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते. शनिवारी दुपारी आपल्या नातेवाईक यांच्याकडे आले आणि तेथे भोजन उरकून अंघोळी करण्यासाठी जाण्यास निघाले. अजय यांचे नातेवाईक पाषाणे गावातील नवीन वसाहती मध्ये राहायला आहेत आणि त्यांना त्या भागाची पूर्ण माहिती नसल्याने पाषाणे येथील लघुपाटबंधारे धरणाची खोली किती आहे आणि नवीन पोहणारे यांच्यासाठी हे धरण धोकादायक आहे यांची माहिती नव्हती. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेच्या माहितीच्या आधारे अजय रावत आणि त्यांचे चार मित्र हे पाषाणे येथील धरणावर अंघोळी करण्यासाठी दुपारी तीन वाजता पोहचले. त्या ठिकाणी दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती आणि त्यामुळे कोणत्या भागात पाण्याची खोली अधिक आहे याची माहिती सांगण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे पाषाणे धरणातील पाण्यात उतरलेला अजय रावत हा पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचे चारही मित्र घाबरले आणि तब्बल तासाभराने अजय सोबत असलेल्या तरुणांनी जेवण ज्यांचे घरी केले त्यांच्या घरी जाऊन अजय पाण्यात बुडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर साडे चार वाजता सर्व नातेवाईक हे धरणावर पोहचले आणि पुन्हा अजय रावत यांचा शोध सुरु झाला. मात्र, त्याचा शोध लागत नसल्याने साडे पाच वाजता नेरळ पोलीस यांना कळविण्यात आले. नेरळ पोलीस ठाण्याकडून कळंब पोलीस चौकीचे उप निरीक्षक आर एल वसावे तसेच पोलीस नाईक निलेश कोंडार हे पाषाणे येथील धरणावर पोहचले. तेथे पोलिसांनी स्थानिक आदिवासी लोकांच्या मदतीने अजय रावत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील शोध लागला नसल्याने शेवटी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी खोपोली येथील अपघातग्रस्त टीम यांना तरुणाच्या बुडाल्याची माहिती दिली. 

रात्र झाल्याने अपघातग्रस्त टीम मधील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठलेकर आणि टीम यांनी आज सकाळी आठ वाजता पाषाणे धरण गाठले. त्यानंतर पाण्यात उतरून या रेस्क्यू टीम ने शनिवारी दुपारी पाण्यात बुडालेल्या अजय विष्णू रावत (28) याचा मृतदेह पाण्यात बाहेर काढून. मृतदेह कळंब येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. संबंधित तरुणाच्या मृत्यूची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत. 

Exit mobile version