ग्रामस्थांच्या सहाय्याने तरुणांना बाहेर काढण्यात यश
। नेरळ । वार्ताहर ।
रत्नागिरी येथून कर्जत येथील आपल्या नातेवाईक यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले आठ तरुण पेजनदीमध्ये वाढलेल्या पाण्यामुळे अडकले. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे अडकल्लेल्या त्या तरुणांना स्थानिक तरुणांनी दोरखंडाचा अवलंब करून नदीच्या बाहेर काढले आणि त्या सर्वांचे प्राण वाचविले.
कर्जत शहरातील आपल्या नातेवाईक यांच्याकडे रत्नागिरी येथील पाहुणे आले होते. रविवार असल्याने वनभोजन करण्याचा कार्यक्रम तयार करून ते सर्वजण वैजनाथ येथे पोहोचले. या भागात पाऊस रिमझिम पडत असून, अद्याप हिरवळदेखील उगवलेली नाही. त्यामुळे त्या भागात असलेल्या शेतजमिनीला पेजनदीचे पाणी ज्या कालव्यातून सोडले जाते, त्या कालव्याच्या झिरो बंधारा येथे त्या सर्वांनी गुडघाभर पाण्यात मौजमजा केली आणि दुपारी दीडच्या सुमारास चुलीवर शिजवलेले अन्न तयार झाल्यावर त्या सर्वांनी पेजनदीमध्ये असलेल्या बंधार्यावर जाऊन जेवणाचा आनंद घेण्याचा निश्चय केला.
त्यावेळी नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढू लागला आणि ते सर्व आठ जण ज्या ठिकाणी बसले होते, त्या बंधार्याच्या आजूबाजूला पाणी भरून आले. त्यावेळी वैजनाथ गावातील अमित गुरव आणि प्रशांत बारणे हे दोघे रविवारची सुट्टी असल्याने नदीवर फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्या आठ तरुणांनी सुरू केलेला आरडाओरड पाहून नदीकडे धाव घेतली. तेथे आठ तरुण नदीच्या मधोमध अडकलेले पाहून तेथे वैजनाथ येथे गावात जाऊन ग्रामपंचायत सरपंच यांचे पती सूरज गुरव यांच्या कानावर ही माहिती सांगितली.
त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सूरज गुरव यांनी आपल्या गावातील गणेश भोईर, सरदार कांबळे, शरद रमेश पवार, नामदेव कातकरी तसेच अमित गुरव आणि प्रशांत बारणे यांनी सोबत दोरखंड घेऊन नदी गाठली. नदीमध्ये उतरून त्या सर्व तरुणांनी नदीच्या मधोमध असलेला बंधारा गाठला आणि एक एक करीत सर्व आठ जणांना बाहेर काढले आणि सर्वांचे प्राण वाचविले.