निजामपूर येथील तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील 19 वर्षीय तरुण गाडी धुण्याचे काम करीत असताना विजेचा शॉक लागून आकस्मित मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.14) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. रामविलास पलटू गौतम (वय-48) सध्या रा.आम्रपाली नगर निजामपूर ता.माणगाव मूळ रा.सकरीकुहीया राज्य उत्तर प्रदेश यांनी माणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.

दुर्गाप्रसाद अलकी यादव (वय-19, सध्या रा.निजामपूर ता.माणगाव मूळ रा.सकरीकुहीया राज्य उत्तर प्रदेश) हा रामविलास पलटू गौतम यांचा मुलगा रुपेश याच्या अपना टू व्हीलर गॅरेजच्या पाठीमागे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टू व्हीलर गाडी धुण्यासाठी गेला होता. त्यावेळी विजेचा शॉक लागून तो खाली पडून बेशुद्ध झाला. या अवस्थेत त्याला उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोजकर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version