| महाड | प्रतिनिधी |
महाड शहराजवळ सुंदरवाडी येथे दुचाकीस्वाराची रस्त्यावर आलेल्या दोन बैलांची धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.15) रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला.
प्रेम मुकेश पवार (वय 18) रा.स्वारगेट पुणे असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो आपला मित्र अभिषेक बनकर ( रा.धनकवडी पुणे ) याच्यासोबत मुंबई-गोवा महामार्गावरून पोलादपूरच्या दिशेने जात होता. देशमुख कांबळे येथील दक्ष देशमुख हा देखील दुसऱ्या एका दुचाकीने पोलादपूरच्या दिशेने जात होता. रात्री पावणे बाराच्या सुमारास रस्त्यावर दोन बैल आल्याने या दुचाकीची धडक दोन बैलांना बसली. यामध्ये प्रेम पवार हा जागीच ठार झाला. तर, त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी अभिषेक बनकर हा जखमी झाला आहे. याचवेळी दुसऱ्या एका दुचाकीने पोलादपूरकडे जात असलेला दक्ष देशमुख हा देखील या अपघातात दरम्यान जखमी झाला आहे. जखमीना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मोकाट गुरांचा सातत्याने नागरिकांना त्रास होत असून या मोकाट गुरांमुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.