| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
शिकार करण्यासाठी मित्रांसोबत जंगलात गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे गुरुवारी (दि.4) उशिरा रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गोळी झाडणाऱ्या संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे घडली आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी शिकारीला आलेल्या सहकाऱ्यालाच लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन सुभाष मर्गज (28) असं मृत तरुणाचं नाव आहे. सचिन मर्गज व सिप्रियान डान्टस हे ओवळीये येथे शिकारीला गेले होते. सिप्रीयन हा बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने उभा होता तर सचिन हा जंगलात हाकारा देण्यासाठी गेला होता. जंगलातील झुडपामध्ये हालचाल झाल्याचं दिसून आल्याने सिप्रियान याने त्या दिशेने गोळी झाडली. यावेळी काही लांडोर पक्षी उडून बाजूला गेले व त्याचवेळी आई… असा मोठा आवाज आला. त्यामुळे सिप्रियान याने त्या ठिकाणी धाव घेतली असता सचिन मर्गजच्या शरीरात गोळी घुसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेला दिसून आला. त्याच्या तोंडावर तसेच छातीत छर्रे घुसले होते. यात अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मृत सचिनचे वडील सुभाष मर्गज यांना कळल्यानंतर त्यांनी त्याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. याबाबतची तक्रार मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सिप्रीयन ॲन्थॉनी डान्टस याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू
