एकाचा मृत्यू, घटनास्थळी तलवार
| कणकवली | प्रतिनिधी |
आर्चिणे घाणेगडवाडी येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये सागर सुरेश पाटोळे (31) याचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा सुरेश कातकर गंभीर जखमी झाला. त्याला कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना बुधवारी (दि.8) रात्री दहाच्या सुमारास घडली.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आर्चिणे घाणेगडवाडी येथील सागर आणि कृष्णा काल रात्री साडेनऊच्या सुमारास कुर्ली घोणसरीच्या जंगलात गेले. तेथे धरणाच्या कालव्याजवळ दोघेही बसले होते. त्यावेळी रस्त्यावर दुचाकी घेऊन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते दुचाकीवरून आर्चिणे दर्डेवाडीच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, सागरच्या छातीला गोळी लागल्यामुळे तो जागीच कोसळला, तर कृष्णाच्या खांद्याला गोळी लागली.
आपल्यावर गोळीबार झाल्याची माहिती त्याने मोबाईलवरून आपल्या वाडीतील मित्रांना आणि स्थानिकांना दिली. त्यानंतर वाडीतील काहींनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. तेथे गेल्यानंतर त्यांना सागर जमिनीवर कोसळलेला दिसला, तर कृष्णा जखमी होता. त्यांनी दोघांनाही त्यांच्या घरी नेले व पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहायक उपनिरीक्षक राजन पाटील, हवालदार शैलेंद्र कांबळे, पोलिस धनाजी धडे, अभिजित तावडे, अजय बिलपे, मोहन राणे, रघुनाथ जांभळे आर्चिणे घाणेगडवाडी येथे पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही कणकवलीला हलविले. उपजिल्हा रुग्णालयात सागरला मृत घोषित करण्यात आले, तर कृष्णाला खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, आर्चिणे घाणेगडवाडी जंगलात गोळीबार झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. सकाळीच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोनी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव घटनास्थळी पोहोचले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह पथक, न्यायवैद्यक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व वरिष्ठ अधिकारी तब्बल तीन तास घटनास्थळ आणि पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.
नेमका प्रकार काय?
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. दोघांनी पांढरा हाफ टी-शर्ट आणि काळसर हाफ पँट घातली होती. त्यांच्या हातात बंदूक होती व डोक्याला बॅटरी लावली होती. गोळीबारानंतर ते दर्डेवाडीच्या दिशेने निघून गेले, अशी माहिती जखमीने पोलिसांना दिली.
पोलिसांना उशिरा कळविले
दोन तासांनंतर पोलिसांना कळविले. रात्री दहाच्या दरम्यानचा हा घटनाक्रम आहे. त्यानंतर तब्बल दोन तासांनी ही माहिती पोलिसांना दिली. इतक्या विलंबाने माहिती का दिली, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे रात्री घटनास्थळी असलेल्या सर्वांचे सीडीआर तपासल्यास अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सीडीआर तपासावेत, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. घटनास्थळी अडीच ते तीन फूट लांबीची एक तलवार सापडली आहे. तलवार तेथे कोणी आणली आणि ती कोणाची आहे, याचा शोध देखील पोलिसांना घ्यावा लागणार आहे.






